वनअधिकाऱ्यांना वनतस्कर जुमानेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:10 PM2018-11-26T23:10:08+5:302018-11-26T23:10:24+5:30
अनिल कडू । लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : अवैध वृक्षतोडीतील आरोपींकडून वनतस्करांची नावे पुढे आल्यानंतर ते वनअधिकाऱ्यांपुढे हजरच होत ...
अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अवैध वृक्षतोडीतील आरोपींकडून वनतस्करांची नावे पुढे आल्यानंतर ते वनअधिकाऱ्यांपुढे हजरच होत नाहीत. हजर होण्याकरिता वनअधिकारी त्यांना नोटीस देतात. पण, या नोटीसला ते जुमानत नाहीत.
पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत बिहाली वर्तुळातील अवैध वृक्षतोडीतील आरोपींकडून ज्या वनतस्करांची नावे पुढे आलीत, त्यांना वनअधिकाऱ्यांनी हजर होण्याबाबत नोटीस दिली. कमळावर लाकडाची अवैध वाहतुकीसंदर्भात ज्या वनतस्कराचे नाव पुढे आले, त्यालाही नोटीस दिली. पण, मागील १५ ते २० दिवसांत ते एकदाही वनअधिकाºयांपुढे हजर झालेले नाहीत.
अवैध वृक्षतोड आपापल्या अधिनस्थ वनक्षेत्रात थांबविण्यात संबंधित वनविभाग अपयशी ठरला. खबऱ्याने पुरविलेल्या माहितीच्या आधारे लाकूड पकडण्याच्या चार-दोन घटना घडतात. यात आरोपी पळून जाण्यात यशस्वी होत आहेत. लाकूड पकडल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या अनेक घटनांची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. आरोपी अज्ञाताविरुद्ध वनगुन्हा नोंदविला जातो. पण, अज्ञात आरोपी वनविभागाच्या हाती कधीच लागत नाहीत. त्या दृष्टीने प्रयत्न होतानाही दिसत नाहीत.
करवा
उभ्या मोठ्या ओल्या सागवान वृक्षाला दोन्ही बाजूने कुऱ्हाडीचे घाव घालून, खाचा पाडून त्या झाडाचा अन्नपुरवठा खंडित केल्या जातो. पुढे हे झाड वाळते आणि वाळलेले हे झाड पुढे तोडले जाते. या करवा पद्धतीने अनेक झाडांची कत्तल केली जात आहे. करवे मारून नवीन लाकूड जुने केले जात आहे.
जुन्या टीपीचा वापर
अवैध सागवानाचा वापर करून व्यवसाय करणारे जुन्या टीपीवर आपला गोरखधंदा खुलेआम करीत आहेत. पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत चौकशी अधिकाऱ्यांच्या हाती अशा दोन टीपी लागल्या आहेत. यातील एक टीपी २०१४ ची, तर एक टीपी २०१६ ची आहे. ज्यांच्याकडून या टीपी ताब्यात घेण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडून ५० ते ६० हजारांचा सागवान मालही चौकशी अधिकाऱ्यांनी पकडला आहे. हा पकडलेला माल मात्र ओला आहे. आवाक-जावक रजिस्टरला तिलांजली देत खोट्या बिलबुकाच्या आधारे जुन्या टीपीतील माल वर्षोगणिक शिल्लक दाखवित हा अवैध व्यवसाय सुरू आहे.
वनातील अधिकारी?
वनांच्या संरक्षणार्थ वनात राहणारे वनअधिकारी अत्यल्पच आहेत. मोठ्या प्रमाणात वनअधिकारी व वनकर्मचारी वनाबाहेर वास्तव्यास आहेत. वनअधिकारी म्हणजे वनात राहणारा, वनसंरक्षणार्थ राबणारा ही संकल्पनाच मुळात नष्ट होत चालली आहे. वाºयावर असलेल्या जंगलाचा फायदा वनतस्कर उचलत आहेत.
शेतीरब्बा-खसरा
शेतकऱ्यांच्या शेतातील सागवानला ‘शेतीरब्बा’ संबोधले जाते. हा शेतीरब्बा जेव्हा व्यापारी विकत घेतो तेव्हा त्याला ‘खसरा’ म्हटले जाते. या खसऱ्याच्या आधारे अवैध वृक्षतोडीतून मिळविलेले अवैध सागवान मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. खसऱ्याच्या आधारे आरागिरणीवरही हे अवैध सागवान कापले जात आहे. यात परतवाडा शहरातील दोन आरागिरणींची नावे चर्चेत आहेत. वनअधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासही खसरा हा घटक पोषक ठरला आहे.
वरिष्ठ वनअधिकारी अनभिज्ञ
बिहाली व एकताई वर्तुळातील अवैध वृक्षतोडीची आकडेवारी आणि नुकसानाची रक्कम बघता उपवनसंरक्षक व मुख्य वनसंरक्षकांनी घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट द्यायला हवी होती. पण अजूनही या वनअधिकाºयांनी भेट दिलेली नाही.वनसंरक्षणार्थ परिणामकारक उपाययोजना सुचवून क्षेत्रीय वन कर्मचाºयांचे मनोबल वाढविणारी सक्षम यंत्रणाही त्यांनी कार्यान्वित केलेली नाही. यातच सहा-सात महिन्यांपूर्वी पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत जारिदा वनपरिक्षेत्रातील राहू आणि कारंज येथील शासकीय वनकुपात लाकूड कटाईदरम्यान दोन मजुरांचा मृत्यू झाला. या घटनेच्या अनुषंगाने अजूनपर्यंत उपवनसंरक्षक आणि मुख्य वनसंरक्षक यांनी घटनास्थळाला, मृताच्या कुटुंबीयांना भेट दिलेली नाही. या सर्व घटनांबाबत अनभिज्ञ असल्यागत ते आहेत.