वनाधिकाऱ्यांना सर्व्हिस रिव्हॉल्व्हर जमा करण्याचा धडकला आदेश
By गणेश वासनिक | Published: August 23, 2023 12:30 PM2023-08-23T12:30:47+5:302023-08-23T12:32:13+5:30
दीपाली चव्हाण प्रकरणाच्या पुनरावृत्तीची भीती तर नाही ना?
गणेश वासनिक
अमरावती :अमरावती वन विभागातील एका नवख्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी महिला वनाधिकाऱ्यांना उर्मट वागणूक देत निलंबन करून चौकशी केली जाईल, अशी तंबी कर्मचाऱ्यांसमक्ष दिल्याचे प्रकरण गत चार दिवसांपूर्वी समोर आले. मात्र, हे प्रकरण आता अंगलट येणार असल्याने या नवख्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. परिणामी, सर्वच वनाधिकाऱ्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर जमा करण्याचे फर्मान सोडण्यात आले असून, या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हल्ली वन विभागात जमा असल्याची माहिती आहे.
मेळघाटच्या हरिसाल येथील आरएफओ दीपाली चव्हाण यांनी २०२१ मध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकरण शांत होत नाही, तोच आता अमरावती येथे महिला वनाधिकाऱ्यांना उर्मट वागणूक मिळाल्याने त्या प्रचंड अस्वस्थ झाल्या आहेत. या महिला वनाधिकाऱ्यांनी थेट ‘त्या’ वरिष्ठांना भ्रमणध्वनीवर मीसुद्धा दीपाली चव्हाण होईल, असा गर्भित इशारा देत सुनावले आहे. त्यामुळे या नवख्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी या प्रकरणातून बचाव करण्यासाठी कनिष्ठांच्या माध्यमातून अधीनस्थ वनाधिकाऱ्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर जमा करण्याचे पत्र निर्गमित केले. किंबहुना वनाधिकाऱ्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरसुद्धा जमा झाल्या आहेत. या प्रकारामुळे अमरावतीचा वन विभाग एकूणच हादरला असल्याचे वास्तव आहे.
चार ओळींचे पत्र अन् सर्व्हिस रिव्हॉल्व्हर जमा
अमरावती वन विभागात वनाधिकाऱ्यांना स्वसंरक्षणासाठी दिलेल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर जमा करण्याबाबतचे दोन ओळीचे पत्र १७ ऑगस्ट २०२३ रोजी जारी करण्यात आले. तोच दुसऱ्या दिवशी १८ ऑगस्ट रोजी वनाधिकाऱ्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर, दारूगोळा विभागीय कार्यालयात जमा करण्यात आला. मात्र, या पत्रात शस्त्रसाठा कोठे जमा करायचा आहे व तो कशासाठी जमा करावयाचा आहे, याबाबत उल्लेख नाही.
‘त्या’ महिला वनाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न
वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या वागणुकीमुळे ही महिला अधिकारी ‘डिप्रेशन’मध्ये गेल्याची माहिती आहे. त्यामुळे भविष्यात दीपाली चव्हाण यांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी या वरिष्ठ अधिकाऱ्याने एका दुसऱ्या महिला वनाधिकाऱ्यांची मदत घेतली आहे.‘डिप्रेशन’मध्ये गेलेल्या या महिला वनाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू असून, याविषयी अज्ञातस्थळी दोन तास चर्चादेखील झाल्याची माहिती आहे. त्यामुळेच ऑगस्टअखेर वनाधिकाऱ्यांसाठी ताणतणाव निवळण्यासाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर होणार आहे.
कोणत्याही वनाधिकाऱ्यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर अथवा दारूगोळा हा पोलिसांत जमा करावा लागतो. वन विभागात ठेवता येत नाही. कारण शस्त्रागार नाही, त्याकरिता कारणे द्यावी लागतात. कनिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व्हिस रिव्हॉल्व्हर जमा करण्याचे पत्र काढता येत नाही. जो काही प्रकार झाला तो नियमबाह्य आहे. याबाबत वरिष्ठांनी कारवाई करावी.
- हेमंत छाजेड, सेवानिवृत्त वरिष्ठ वनाधिकारी