कॅप्टन अशोक महाजनांनी केले होते भाकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:07 AM2019-03-01T01:07:57+5:302019-03-01T01:08:24+5:30
देशाच्या सीमेचे दोन पिढ्यांपासून रक्षण करणारे धामणगाव येथील महाजन कुटुंबातील कॅप्टन अशोक महाजन यांनी सर्जिकल स्ट्राईकचे भाकीत केले होते. मंगळवार ते खरे ठरले. शहरातील माजी सैनिकांनी वायुसेनेने पाकला दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल जल्लोष केला.
धामणगाव रेल्वे : देशाच्या सीमेचे दोन पिढ्यांपासून रक्षण करणारे धामणगाव येथील महाजन कुटुंबातील कॅप्टन अशोक महाजन यांनी सर्जिकल स्ट्राईकचे भाकीत केले होते. मंगळवार ते खरे ठरले. शहरातील माजी सैनिकांनी वायुसेनेने पाकला दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल जल्लोष केला.
कुटुंबापेक्षा देशसेवेला महत्त्व देणाऱ्या नारगावंडी येथील महाजन कुटुंबाची दुसरी पिढी सीमेवर तैनात आहे. तसाही धामणगाव हा सैनिकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. नारगावंडी येथील गोविंदराव महाजन हे ब्रिटिशांच्या काळात सैन्यात दाखल झाले होते. त्यांचा भारत-चीन युद्धात सहभाग होता. वडिलांपासून देशसेवेचे धडे घेऊन मोठा मुलगा अशोक महाजन हे वयाच्या एकविसाव्या वर्षी सैन्यात दाखल झाले. त्यांनी तब्बल ३४ वर्षे सीमेचे रक्षण केले. ते कॅप्टन म्हणून ओळखले जातात. त्यांचे धाकटे बंधू जगदीश महाजन हे एकोणिसाव्या वर्षी सैन्यात दाखल झाले. ते २० वर्षे पॅराशूट तुकडीमध्ये कार्यरत होते.
धामणगाव तालुक्यात सुमारे सव्वाशे माजी सैनिक आहेत. कॅप्टन अशोक महाजन यांनी भारत-पाकिस्तान युद्धात कामगिरी बजावली होती. त्यांच्या नेतृत्वात बुधवारी धामणगाव शहरातील माजी सैनिकांनी जल्लोष साजरा केला. पाकिस्तानला धडा शिकवणे गरजेचे होते. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद समूळ नष्ट होईपर्यंत भारतीय सैनिक स्वस्थ बसणार नाहीत, असे मत कॅप्टन महाजन यांनी व्यक्त केले.