पीक विमा कंपनीच्या सर्व्हेअरद्वारा ५२ शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 22, 2024 09:36 PM2024-05-22T21:36:11+5:302024-05-22T21:36:20+5:30

चिंचपूर येथील प्रकार उघड : ‘त्या’ शेतकऱ्यांना परतावा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Forged signatures of 52 farmers by surveyor of crop insurance company | पीक विमा कंपनीच्या सर्व्हेअरद्वारा ५२ शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या

पीक विमा कंपनीच्या सर्व्हेअरद्वारा ५२ शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या

अमरावती : बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा न मिळाल्याने ओरड सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. धामणगाव तालुक्यातील चिंचपूर येथील बाधित ५२ शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या सर्व्हेअरनेच केल्या आहेत. हा प्रकार १७ मे रोजीच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत उघड झाला व कंपनीच्या प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष मान्य केला.

पीक विमा कंपनीचे काही सर्व्हेअर बाधित पिकांचे पंचनामे करताना शेतकऱ्यांना पैशांची मागणी करीत असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले. ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले नाहीत, त्या शेतकऱ्यांचे नुकसान कमी दाखविण्याचा प्रतापही काही सर्व्हेअरद्वारा करण्यात आलेला आहे. पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बहुतांश सर्व्हेअरची पात्रता निकष पूर्ण नसल्याचे यापूर्वीच्या बैठकांमध्ये स्पष्ट झालेले आहे.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील मौजा चिंचपूर येथील बाधित ५२ शेतकऱ्यांच्या पिकांचा सर्व्हे करताना सर्व्हेअरने पीक नुकसानीचे पंचनाम्यावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी घेतल्याच नाही. याऐवजी त्याने स्व:तीच स्वाक्षरी मारली व यामध्ये ० ये ५ टक्केच नुकसान दाखविल्याने शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले आहेत. याबाबत जिल्हा समितीचे सचिव व एसएओ राहुल सातपुते यांनी ही बाब समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या निदर्शनात आणली. त्यामुळे १५ दिवसांत परतावा देण्याचे आदेश त्यांनी कंपनीला दिले आहेत.
----------------
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले परताव्याचे आदेश
धामणगाव तालुक्यातील या सर्व्हेअरने ज्या महसूल मंडळात सर्व्हेक्षणाचे काम केले आहे. अशा मंडळातील सर्व शेतकऱ्यांच्या पूर्वसूचनांची पुन्हा तपासणी करून दोन आठवड्यांच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शिवाय तालुक्यात प्राप्त पूर्वसूचना झालेला सर्व्हे, पात्र, अपात्र पूर्वसूचना आदी माहिती तालुका कार्यालयाच्या बोर्डवर लावण्याचे आदेश दिले
----------------
नांदगाव तालुक्यातही उघड झाला प्रकार
नांदगाव तालुक्यात कंपनीद्वारा ‘पेरील नॉट कव्हर, पोस्ट सर्व्हे इनर्लिजिबल, पेरील नॉट अकुअर्ड’ आदी कारणे दर्शवित सूचना नाकारल्या. प्रत्यक्षात पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांकावरून सूचना दिली असता ‘नुकसानीपूर्वी सूचना नोंदविली’ या सदराखाली नाकारली. या पूर्वसूचनांची फेरतपासणी करून १५ दिवसांत परतावा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
-----------------
चांदूरबाजार तालुक्यात फळ पीक विम्याचा ट्रिगर बदलला
चांदूरबाजार तालुक्यात २४ ते २६ जानेवारीदरम्यान थंडीची लाट होती, मात्र हवामान केंद्राभोवती शेकोटी पेटविल्याने व केंद्राच्या कम्पाउंडला २०० वॅटचा बल्ब लावल्याने तापमान आकडेवारीत फरक पडला व फळ पीक विम्याचा ट्रिगर लागला नाही. त्यामुळे लगतच्या शिरजगाव कसबा केंद्राची आकडेवारी ग्राह्य धरण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
------------------
जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या बैठकीत समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी पीक विमा कंपनीला विविध निर्देश दिले आहेत. ते सर्व कंपनीला पाठविण्यात आलेले आहेत.
- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Forged signatures of 52 farmers by surveyor of crop insurance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.