७७ लाखांच्या नस्तीमध्ये अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी बनावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 05:00 AM2020-06-19T05:00:00+5:302020-06-19T05:01:27+5:30
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत प्रभाग समिती क्रमांक ४ बडनेरा झोनमध्ये वैयक्तिक शौचालय बांधण्याच्या प्रकारातील ७७ लाखांच्या अनुदान देयकांच्या तीन नस्ती आयुक्तांसमोर मंजुरीसाठी गुरुवारी सादर करण्यात आल्यात. सध्या कोरोनाच्या संकटकाळात महापालिकेजवळ एवढा निधी उपलब्ध आहे काय तसेच यापूर्वीच्या कार्यकाळातील प्रकरण असल्याने आयुक्तांनी याविषयीची चौकशी केली असता, या सर्व नस्तीमधील संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी बनावट असल्याची बाब सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या निदर्शनास आले.
गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा झोनमधील ४०० हून अधिक वैयक्तिक शौचालय बांधकामाच्या ७७ लाखांच्या तीन देयकांवर सर्व अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आले. यामुळे घोटाळा होण्यापूर्वीच उघडकीस आला. यामागे कर्मचारी व कंत्राटदारांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याने याप्रकरणी आयुक्त प्रशांत रोडे यांनी उपायुक्त विजय खोराटे यांना चौकशी अधिकारी नियुक्त करून तत्काळ अहवाल मागितला आहे.
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत प्रभाग समिती क्रमांक ४ बडनेरा झोनमध्ये वैयक्तिक शौचालय बांधण्याच्या प्रकारातील ७७ लाखांच्या अनुदान देयकांच्या तीन नस्ती आयुक्तांसमोर मंजुरीसाठी गुरुवारी सादर करण्यात आल्यात. सध्या कोरोनाच्या संकटकाळात महापालिकेजवळ एवढा निधी उपलब्ध आहे काय तसेच यापूर्वीच्या कार्यकाळातील प्रकरण असल्याने आयुक्तांनी याविषयीची चौकशी केली असता, या सर्व नस्तीमधील संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी बनावट असल्याची बाब सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या निदर्शनास आले. एकूण हे प्रकरण गंभीर असल्याने आयुक्त प्रशांत रोडे यांंनी याप्रकरणी उपायुक्त विजय खोराटे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली व अतिशीघ्र अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
काय आहे प्रकरण?
स्वच्छ नागरी अभियानांतर्गत बडनेरा झोनमध्ये वैयक्तिक शौचालय बांधण्याचे हे प्रकरण आहे. महापालिका क्षेत्र हगणदरीमुक्त करण्यासाठी ज्यांच्या घरी शौचालय नाहीत, अशा नागरिकांकडून अर्ज मागितले गेले. यात १७ हजाराच्या अनुदानात पाच हजार वित्त आयोगाचे व १० हजार स्वच्छ भारत मिशनचे असतात. काही लाभार्थींनी अनुदान घेतले; मात्र बांधकाम केले नसल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका प्रशासनाद्वारे ४०० ते ४५० वैयक्तिक शौचालये बांधकामासाठी एका कंत्राटदाराची नियुक्ती केली होती. याविषयी २५ लाखांच्या दरम्यान देयकाच्या तीन नस्ती गुरुवारी आयुक्तांसमोर अंतिम स्वाक्षरीसाठी आल्या. यामध्ये सर्व अधिकाºयांची स्वाक्षरी बनावट असल्याचे लक्षात आल्याने ७७ लाखांचा अपहार होण्यापूर्वी बिंग फुटले.
असा उघडकीस आला प्रकार
तिन्ही नस्ती बडनेरा झोन कार्यालयातून आवकद्वारे आलेल्या आहेत. यामध्ये स्वच्छता निरीक्षक, अभियंता, उपअभियंता, वैद्यकीय आयुक्त अधिकारी, सहायक आयुक्त, उपायुक्त, लेखाधिकारी आदींची स्वाक्षरी शेऱ्यासहित हुबेहूब काढण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. कंत्राटदारासाठी महापालिकेचे कोण कर्मचारी राबले, हे आता या चौकशीत समोर येणार आहे. विशेष म्हणजे, फाईलदेखील मूळ स्वरूपात आहे.
लाभार्थींची चौकशी महत्त्वाची
बडनेरा झोनमधील ४०० हून अधिक लाभार्थींच्या घरी शौचालये बांधल्यासंदर्भात हे ७७ लाखांचे देयक होते. त्यामुळे ज्या नागरिकांच्या घरी बांधकाम करण्यात आल्याचे नमूद आहे, त्या सर्व नागरिकांच्या घरी भेटी देऊन चौकशी झाल्यास किती शौचालयांचे बांधकाम कंत्राटदाराने केले, किती कामे बोगस दाखविले आणि या बनावात त्यांना अमरावती महापालिकेच्या कोणकोणत्या कर्मचाºयांनी मदत केली, हे स्पष्ट होणार आहे.