माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा पडला विसर
By admin | Published: January 10, 2016 12:31 AM2016-01-10T00:31:32+5:302016-01-10T00:31:32+5:30
स्वतंत्र महाराष्ट्र राज्यानंतर दुसरे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती व पुण्यतिथीचा शासकीय कार्यालयाला विसर पडला आहे़ ...
आज ११६ वी जयंती : जयंती, पुण्यतिथीच्या परिपत्रकात नामोल्लेख नाही
मोहन राऊत अमरावती
स्वतंत्र महाराष्ट्र राज्यानंतर दुसरे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती व पुण्यतिथीचा शासकीय कार्यालयाला विसर पडला आहे़ दोन वर्षांपूर्वी काढलेल्या या पत्रकात साधा नामोल्लेख नसल्याने त्यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे़
राज्यशासनाच्या सामान्य प्रशासनाच्यावतीने राष्ट्रीय पुरूषांची तथा थोर व्यक्तींची जयंती तसेच पुण्यतिथी साजरी करण्याबाबत परिपत्रक काढण्यात येते़ या परिपत्रकात राज्याचे पहिले मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण यांच्यासह दीर्घकाळ मुख्यमंत्री असलेले विदर्भातील स्व़वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा उल्लेख आहेत़ परंतु स्वतंत्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळून पदावर असताना मृत्यू पावलेले स्व़मारोतराव कन्नमवार यांचे नाव या परिपत्रकात नसल्यामुळे बेलदार समाजाने नाराजी व्यक्त केली आहे़
कन्नमवारांचा अनेक लढ्यात सहभाग
भारताच्या लढ्यासाठी मोलाचे योगदान चंद्रपूर येथे मारोतराव साबन्ना कन्नमवार यांचा जन्म १० जानेवारी १९०० मध्ये झाला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ज्युबिली हायस्कूल येथेच झाल्यानंतर त्यांनी १९१८ मध्ये भारत स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतला. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासोबत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हातभार लावला़ महात्मा गांधींच्या विचाराने काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता़
शासन कधी घेणार दखल ?
प्रत्येक राष्ट्रीय पुरूषांची, नेत्यांची जयंती व पुण्यतिथी असे परिपत्रक दरवर्षी शासन काढतात. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान असलेल्या या थोर पुरूषाला शासन विसरल्याचे दिसत आहे़ शासकीय परिपत्रकात जयंती, पुण्यतिथींची नोंद घेतल्यास शाळा, महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालयांत त्यांची जयंती साजरी होऊ शकते़ मात्र शासन कधी दखल घेणार, असा सवाल बेलदार समाज संघटनेचे प्रमुख सुधाकर पांडेंनी उपस्थित केला़
कन्नमवारांच्या आठवणींना मिळणार उजाळा
माजी मुख्यमंत्री स्व़मा़साक़न्नमवार यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त रविवार १० जानेवारीला नागपूर येथे विधानभवनात विमुक्त भटक्या जाती, जमाती आयोगाचे अध्यक्ष दादासाहेब इंधाते यांच्या अध्यक्षतेखाली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, माजी आमदार अरूण अडसड यांच्या उपस्थितीत बेलदार समाज संघर्ष समितीच्यावतीने स्व. कन्नमवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे़
राज्य शासनाने माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या जयंतीची नोंद शासकीय परिपत्रकात घेण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडवणीस यांची भेट घेणार आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुटी जाहीर करावी, अशीही आमची मागणी आहेत़
- राजेंद्र बढीये, अध्यक्ष, बेलदार समाज संघर्ष समिती.