निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या माजी खासदारांनी समस्या
By admin | Published: June 17, 2015 12:47 AM2015-06-17T00:47:14+5:302015-06-17T00:47:14+5:30
नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंगळवारी माजी खासदार अनंत गुढे यांनी
अमरावती : नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंगळवारी माजी खासदार अनंत गुढे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचत यावर तोडगा काढण्याबाबत निवेदन देऊन चर्चा केली.
नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील श्रावण बाळ योजनेंतर्गत रखडलेले प्रकरणे तातडीने निकाली काढावेत, जात पडताळणीचे प्रकरण निकाली काढण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात याव्यात, तालुक्यात मंजूर घरकुलांचे जागेकरिता प्रलंबित असलेल्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घ्यावा, नांदगाव खंडेश्र्वर येथील बस स्थानक परिसरात पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, नांदगाव खंडेश्र्वरजवळच असलेल्या यवतमाळ मार्गावरील खंडेश्र्वर मंदिराजवळील गाव तलावाचे खोलीकरण करावे, अशाप्रकारे विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाने लक्ष देऊन यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी माजी खासदार अनंत गुढे यांच्या नेतुत्वातील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी पातुरकर यांना सादर केलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब भागवत, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब राणे, तालुकाप्रमुख सुभाष मुळे, धामकचे सरपंच प्रवीण चौधरी, पुंडलिक तऱ्हेकर, अमोल धवस, अमोल दांडगे व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)