शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ, मुलगा, जावयाकडे ईडीच्या धाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 07:17 AM2021-09-10T07:17:15+5:302021-09-10T07:17:48+5:30
सिटी बँक घोटाळा प्रकरण; निवासस्थानांचीही झाडाझडती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांचा माजी आमदार मुलगा व जावई यांची निवासस्थाने तसेच कार्यालयांवर एकूण सहा ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी धाडसत्र राबविले. मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केल्याची माहिती आहे.
आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार केला असून सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेन्शनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम, गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप ईडीकडे नोंदविलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. त्याआधारे ईडीने बुधवारी अडसुळांसह माजी आमदार तथा बँकेचे संचालक अभिजित अडसूळ व जावई यांची घरे, कार्यालयांची झाडाझडती घेतली. ईडीला चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे. अभिजित हे २००९ मध्ये दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. खातेदार, ठेवीदारांनी तक्रारी केल्या होत्या.
खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाची तारीख असली की दरवेळी त्यांचे
असे काही ना काही उपद्व्याप सुरू असतात. ते न्यायालयातून लवकरच स्पष्ट होईल. बँकेत गैरव्यवहाराबाबत अगोदर आम्हीच तक्रार केली आहे.
लक्ष विचलित करण्यासाठी ईडी चौकशीचा हा फार्स आहे.
- अभिजित अडसूळ, माजी आमदार.
मुंबई येथील सिटी बँकेत माजी खासदार यांनी ९०० कोटींचा घाेटाळा केल्याप्रकरणी ईडीकडे आपण स्वत: तक्रार केली होती. त्याअनुषंगाने ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. ठेवीदार, खातेदारांच्या श्रमाची रक्कम बळकावण्याचा हा प्रकार आहे.
- रवि राणा, आमदार, बडनेरा