वने व वन्यजिवांच्या संरक्षण, संवर्धनासाठी मेळघाटात ‘फॉरेस्ट मेजर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:35 AM2017-11-22T11:35:46+5:302017-11-22T11:38:45+5:30
वन्यजिवांचा शिकारींपासून बचाव करता यावा, यासाठी ‘फॉरेस्ट मेजर’ हा उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्प राबविणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १०० जणांची निवड केली जाणार असून, यात विद्यार्थ्यांना प्राधान्य राहील.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वन्यजिवांचा शिकारींपासून बचाव करता यावा, यासाठी ‘फॉरेस्ट मेजर’ हा उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्प राबविणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १०० जणांची निवड केली जाणार असून, यात विद्यार्थ्यांना प्राधान्य राहील.
पोलीस प्रशासनाच्या धर्तीवर वनविभागाचे जाळे हे गाव, खेड्यात पसरविण्यासाठी वनविभाग सरसावला आहे. विशेषत: वने, वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यातील ११ प्रादेशिक तर चार वन्यजीव विभागाला राज्य शासनाने लक्ष करताना वनांची समृद्धी आणि वन्यपशूंचे संवर्धन याविषयी कृती आराखडा तयार केला आहे. वनांवर आधारित असलेल्या समुहाला ‘फॉरेस्ट मेजर’ मध्ये अग्रणी स्थान देण्यावर व्याघ्र प्रकल्पाचा भर आहे. सहभागी होण्यासाठी यात वयाचे बंधन नसले तरी विद्यार्थ्यांना सामवून घेतले जाणार आहे. दर रविवारी वन्यजीव, वनांबाबत मंथन होईल.
‘फॉरेस्ट मेजर’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी स्पर्धा चालविली आहे.
- एम. एस. रेड्डी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प