कौंडण्यपूरमध्ये कलश स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:00 PM2018-11-16T22:00:29+5:302018-11-16T22:00:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुऱ्हा : देवी रुक्मिणीचे माहेरघर कौंडण्यपुरात शुक्रवारपासून कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला. यंदा विठ्ठल रुक्मिणीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुऱ्हा : देवी रुक्मिणीचे माहेरघर कौंडण्यपुरात शुक्रवारपासून कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला. यंदा विठ्ठल रुक्मिणीच्या अभिषेक व कलश स्थापनेचा मान टाकरखेड येथील लहानुजी महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब पावडे यांना मिळाला. पावडे दाम्पत्याने सकाळी ८ च्या सुमारास पूजा केली.
यात्रा महोत्सवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानात २७ नोव्हेंबरपर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रम होतील. २४ नोव्हेंबरला सकाळी कार्तिक पौर्णिमेची महापूजा व दुपारी ५ वाजता गोकुळपुरीत शेकडो पालख्या व हजारो वारकरींच्या उपस्थितीत दहीहंडी सोहळा तसेच २७ नोव्हेंबरला महाप्रसाद होईल.
कार्तिक पौर्णिमेला पंढरीचा विठ्ठल अडीच दिवसांसाठी कौंडण्यपूरमध्ये मुक्कामी असतो. त्यामुळे विदर्भातील ज्या लोकांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते लोक येथे दर्शनासाठी येतात.
दहीहंडीला २५ हजारांवर भाविक
वारकरी संप्रदायाचे भाविक तसेच विदर्भातील शेतकरी, शेतमजूर, कामगार येथे दर्शनासाठी मोठ्या उत्साहाने येतात. कार्तिक पौर्णिमेच्या दहीहंडीला २५ हजारापेक्षा जास्त भाविक उपस्थित असतात. त्यामुळे येथील यात्रेत पोलीस यंत्रणेकडून चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येतो. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या कलश स्थापनेच्या कार्यक्रमाला देवस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर, उपाध्यक्ष वसंत डाहे, विश्वस्त अतुल ठाकरे, व्यवस्थापक काळे, पुजारी बेले, आकाश ठाकरे तसेच वारकरी भजनी मंडळी उपस्थित होती. यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने बंदोबस्ताची जबाबदारी कुऱ्हा पोलिसांकडे आहे. शुक्रवारपासून ३० कर्मचारी, तीन अधिकाऱ्यांसह वाहतूक पोलीस तैनात आहेत. परिसरात विशेष पॉइंट उभारण्यात आले आहेत.