साडेचारशे भाविकांनी धरली पंढरीची वाट, १०० बसेसचे नियोजन
By जितेंद्र दखने | Published: June 24, 2023 04:51 PM2023-06-24T16:51:20+5:302023-06-24T16:52:11+5:30
दोन दिवसांत १० लालपऱ्या लागल्या धावू
अमरावती : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या यात्रेसाठी राज्य एसटी महामंडळाने विभागातील ८ आगारांतून १०० बसेस सोडण्याची नियोजन केले आहे. यानुसार गुरुवार आणि शनिवार अशा दोन दिवसांत १० एसटी बसेस पंढरपूरसाठी रवाना झाल्या आहेत. या बसेसद्वारे जिल्हाभरातील ४५० वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे.
यंदादेखील आषाढीवारीच्या निमित्ताने जिल्ह्यातील लाखो भाविक पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. जिल्ह्यातून एकादशीला भाविक दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी प्रमाणात असते. या भाविकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ज्यादा वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
विभागातील अमरावती, बडनेरा, परतवाडा, दर्यापूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड,आणि चांदूर रेल्वे अशा आठ आगारामधून १०० एसटी बसेसचे नियोजन विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे. त्यानुसार एकादशीसाठी पंढरपूरला गुरुवारी ४ बसेस आणि शुक्रवारी ६ अशा १० बसेस सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये १२० अमृत ज्येष्ठ नागरिक,१८६ महिला आणि १४६ इतर वारकरी असे एकूण ४५२ भक्त पांडुरंगाचे भेटीला आषाढी एकादशीनिमित्त रवाना झाले आहेत.
महामंडळाने २१ ते २९ जूनपर्यंत वारकऱ्यांना पंढरपूर जाण्यासाठी बसेस आहेत. तर परतीच्या प्रवासाकरिता २९ जून ते ४ जुलैपर्यंत लालपरीची प्रवाशांसाठी सुविधा एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. अमरावती विभागातील एसटी बसेसकरिता पंढरपूर येथे भीमा बसस्थानकावर नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आदी ठिकाणांहून येणाऱ्या व जाणाऱ्या बसेस प्रवाशांची ने-आण करणार आहेत.
महिला, ज्येष्ठ नागरिकांची एसटीला पसंती
आषाढीवारीच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. पण रेल्वे प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिकांच्या तिकीट दरातील सुविधा बंद केली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यभरातून एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटामध्ये ५० टक्के सरसकट सवलत दिली आहे. तसेच ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली करून दिली आहे. याशिवाय ६५ वर्षांपुढील नागरिकांना अर्धे तिकीट प्रवास भाडे आकारले जाते. यामुळे वारीतील ज्येष्ठ नागरिक एसटीला प्रथम पसंती दर्शवताना दिसून येत आहे.