‘त्या’ मानवी तस्करीत उज्जैन, राजस्थानातून चौघे जेरबंद
By प्रदीप भाकरे | Published: March 20, 2023 05:55 PM2023-03-20T17:55:03+5:302023-03-20T17:55:31+5:30
बालविवाहाचे कलम वाढविले : १.३० लाखांत अल्पवयीन मुलीची विक्री
अमरावती : येथील एका अल्पवयीन मुलीची परप्रांतात विक्री केल्याप्रकरणीच्या गुन्हयात गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातून एकाला तर राजस्थानातून तिघांना जेरबंद केले. ह्युमन ट्रॉफिकिंगच्या या गुंतागुंतीच्या प्रकरणात या चार आरोपींची अटक शहर पोलिसांसाठी ‘मैलाचा दगड’ ठरली आहे. शहर गुन्हे शाखा व महिला सहाय कक्षाने रविवारी ही यशस्वी कारवाई केली. चारही आरोपींना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी यांनी सोमवारी पत्रपरिषदेत त्या गुन्हयाचा अधिक उलगडा केला. यावेळी पोलीस उपायुक्त विक्रम साळी व क्राईम एसीपी प्रशांत राजे उपस्थित होते. फरीद अली एहसान अली (३०, रा.बडनगर, जि. उज्जैन, मध्यप्रदेश), चंपादास बालुदास वैष्णव (३३, रा. देवडिया, ता. लसाडिया, जि. उदयपूर, राजस्थान), सुरेशदास जमनादास वैष्णव (४०, रा. दावडिया, ता. सराडा, जि. उदयपूर) व संजय पुूरूषोत्तमदास वैष्णव (२३, रा. आनंदीयोका गुढा, ता. लसाडिया, उदयपूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील फरिदअली एहसान अलीच्या माध्यमातून त्या अल्पवयीन मुलीची १ लाख ३० हजारांमध्ये राजस्थानात विवाहासाठी विक्री करण्यात आली होती. तर संजय वैष्णव याच्याशी त्या मुलीचे लग्न लावून देण्यात आले होते.
चंपादास व सुरेशदास या दोघांशी फरीदअलीने तो व्यवहार केला होता. दरम्यान आरोपींना पकडण्यासाठी शहर गुन्हे शाखेचे दोन स्वतंत्र पथके राजस्थान व मध्यप्रदेशात पाठविण्यात आली होती. चारही आरोपींना अमरावतीत आणल्यानंतर पिडित अल्पवयीन मुलीकडून त्यांची शहानिशा व ओळख परेड करवून घेण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणात बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अन्वये गुन्ह्याची वाढ करण्यात आली आहे.
यांनी केली मोहिम फत्ते
मानवी तस्करीच्या या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुन्हे शाखेला दिले होते. त्यांच्या आदेशाने उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा प्रमुख अर्जुन ठोसरे, महिला सहायता कक्षाच्या पोलीस निरिक्षक ज्योती विल्लेकर, सहायक पोलीस निरिक्षक पंकज चक्रे, सायबरचे सहायक पोलीस निरिक्षक रवींद्र सहारे, हवालदार देवेंद्र कोठेकर, राजेंद्र काळे, पंकज गाळे, विशाल वाकपांजर, राहुल खंडारे, भुषण पद्मने आदींनी केली.
अशी झाली होती घटना
२७ जानेवारी रोजी येथील एका अल्पवयीन मुलीला संतोष इंगळे व अन्य चौघांनी पळवून मध्यप्रदेशात पळवून नेले होते. तेथे फरिदअलीच्या माध्यमातून तिची राजस्थानात वैष्णव कुटुंबाला विक्री करण्यात आली. तेथे तिचा बालविवाह लावण्यात आला. तेथून तिने पळ काढून गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले होते. तिच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी पाच ते सहा जणांविरूद्ध मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला होता. तर, संतोष इंगळे, मुकेश राठोड व चंदा मुकेश राठोड (सर्व रा. अकोला) यांना अटक केली होती. यातील आकाश वेरूळकर हा अद्यापही फरार आहे.