अस्वल हत्येप्रकरणी चौघांना अटक
By admin | Published: January 26, 2017 12:37 AM2017-01-26T00:37:56+5:302017-01-26T00:37:56+5:30
नजीकच्या वडुरा शेतशिवारातील अस्वल हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींना वनकोठडी : तिघांनी वाटून घेतले चार पंजे
परतवाडा : नजीकच्या वडुरा शेतशिवारातील अस्वल हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी अस्वलाचे तोडून नेलेले चार पंजे, कुऱ्हाड, तार आदी साहित्य मंगळवारी रात्री वनाधिकाऱ्यांनी जप्त केले आहे.
वडुरा शेतशिवारातील फाटकर यांची शेती लागवडीने करणारा बन्सी गोटू राजणे (५० रा. पांढरी), कालू रामसिंग परते (३९, रा.हरमहू भैसदेही, मध्यप्रदेश), बन्सी शिवराम मावस्कर (४८) व गंगाराम मनसू दारसिंबे (६० दोन्ही रा. बेलखेडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मंगळवारी सकाळी १० वाजता वडुरा शेतशिवारात एका अस्वलाची विद्युत तारेचा जिवंत प्रवाह सोडून हत्या करण्यात आली होती. यासंपूर्ण प्रकाराने वनविभागासह परिसरात खळबळ उडाली होती.
याप्रकरणी वनाधिकाऱ्यांनी चारही आरोपींना अटक करून त्यांचेविरुद्ध १९७२ वन्यजीव अधिनियम ९,३९,४४, ४८,४९,५१ अन्वये गुन्हे दाखल केले आहे. अचलपूर न्यायालयात बुधवारी हजर केले असता न्यायालयाने त्यांना २७ जानेवारीपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. अस्वलाच्या नखांचा गळ्यात ताईत म्हणून वापर करणे शुभ असल्याची अंधश्रद्धा असल्याने अस्वलाचे पंजे कापून नेल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपींचा छडा लावण्यासाठी वनधिकाऱ्यांनी सर्वप्रथम बन्सी राजनेला अटक केली. त्याने उर्वरित आरोपींची नावे सांगितली. सहाय्यक वनसंरक्षक आर.जी.बोंडे, आरएफओ शंकर बारखडे, वनपाल बी.आर.झामरे, जे.डी.काळे, जे.टी. भारती, एन.व्ही.ठाकरे, कुकले सनवासे आदींनी ही कारवाई केली.
शुभ चिन्हासाठी ठेवले अवयव
आरोपींनी शेतात अवैधरित्या जिवंत विद्युत प्रवाह सोडला होता. त्यामध्ये अडकून सोमवारी मध्यरात्री अस्वल ठार झाले. मंगळवारी पहाटे आरोपींनी या मृत अस्वलाच्या हाताचे व पायाचे पंजे कुऱ्हाडीने निर्दयीपणे कापले. त्यानंतर बन्सी मावस्करने दोन, कालू पराते व गंगाराम दारसिबें याने प्रत्येकी एक याप्रमाणे हाताच्या व पायाच्या पंजाचे शुभ चिन्हासाठी वाटप केले.