सलग चार तासात पोलिसांनी मोजले साडेतीन कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:14 AM2021-07-28T04:14:05+5:302021-07-28T04:14:05+5:30
फोटो पी २७ मनी फोल्डर अमरावती : राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे पहाटे ४ ते ७ दरम्यान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...
फोटो पी २७ मनी फोल्डर
अमरावती : राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे पहाटे ४ ते ७ दरम्यान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवत होती. मिळालेली माहितीदेखील अगदी पक्की होती. त्या भरवशावर पहाटे ६ पासून ठाकरे दलबलासह फरशी स्टॉप रस्त्यावर पोहोचले. सापळा रचण्यापासून या जंबो कारवाईला सुरुवात झाली. त्यानंतर सलग नऊ तास पोलीस याच प्रकरणात गुंतून राहिले. एकाच चारचाकी वाहनातून मोठी रक्कम हस्तगत झाली. ती थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ३.५० कोटी. पोलिसांनी फक्त बंडल मोजून एकूण रकमेची गणना केली. तीही मोजायला पोलिसांना चार तासांहून अधिकचा कालावधी लागला.
सकाळी ७.३० च्या सुमारास एका मेकॅनिकला बोलावून एमएच २० डीव्ही ५७७४ या चारचाकी वाहनाची मधली सीट खोलण्यात आली. सीटखालील संपूर्ण लगदा काढला. त्यासाठी मेकॅनिकला एक तास लागला. सकाळी ८ च्या सुमारास त्या वाहनातील मोठी रक्कम दोन मोठ्या खोक्यांमध्ये रचण्यात आली. ती मालखान्यात ठेवण्यात आली, तर दुसऱ्या वाहनातून केवळ आठ हजारांच्या आसपास रक्कम होती. सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण डुंबरे यांच्या उपस्थितीत त्यानंतर पंचनामा व्हिडीओ शूटिंग घेण्यात आली. सुमारे डझनभर अधिकारी कर्मचारी यात सहभागी होते. मशीनने रक्कम मोजण्यास सात-आठ तास लागले असते, अशी प्रतिक्रिया याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.
त्या फ्लॅटची झाडाझडती
सकाळी ८.४५ च्या सुमारास राजापेठचा डीबी स्कॉड फरशी स्टॉप परिसरातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये पोहोचला. तेथून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर रकमेची बंडलनिहाय मोजदाद करण्यात आली.
रात्रीच फ्लॅटवर मुक्कामी
काही प्रत्यक्षदर्शींनुसार, दोन चारचाकी वाहनांमधून नागपूरहून आलेले चौघे मंगळवारी पहाटे २.३० च्या सुमारास फरशी स्टॉपवरील त्या फ्लॅटवर पोहोचले. काही रक्कम तेथूनही गाडीत भरली. पुढील प्रवासाला निघाले असताना पोलिसांनी त्यांना पकडले. मात्र, या घटनाक्रमाला पोलिसांनी दुजोरा दिला नाही.
तो म्हणाला, १५ लाख रुपये
ज्या वाहनातून मोठी रक्कम मिळाली, त्या वाहनचालकाला विचारले असता, ती रक्कम केवळ १५ लाख रुपये असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तेवढीच रक्कम वाहनात आहे, असे आम्हाला सांगण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
कोट
दोन वाहनांमधून ३.५० कोटी रुपये जप्त करण्यात आले. वाहनाच्या सीटखाली ती रक्कम दडवून ठेवण्यात आली होती. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले. ती रक्कम हवालाची की आणखी कशाची, हे आयकर अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर स्पष्ट होईल.
- आरती सिंह, पोलीस आयुक्त