आकाशात पहायला मिळणार चार दिवस आतषबाजी; होणार मोठ्या प्रमाणात उल्कावर्षाव
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: November 8, 2024 06:14 PM2024-11-08T18:14:25+5:302024-11-08T18:15:11+5:30
Amravati : १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान सिंह तारकासमुहातून उल्कावर्षाव
गजानन मोहोड
अमरावती : १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान सिंह तारकासमुहातून मोठ्या प्रमाणात उल्कावर्षाव होणार आहे. पहाटेच्या सुमारास याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आकाशात चार दिवस आतषबाजी पहायला मिळणार आहे.
उल्कावर्षावाची तिव्रता, निश्चित तारीख, वेळ या गोष्टी खात्री सांगता येत नाही. घराबाहेर आणि भराभर उल्का पडतांना दिसल्या अशी अवास्तव कल्पना कोणी करु नये. उल्काचे निरीक्षण आणि त्याच्या नोंदीची खगोल जगतात खूप गरज आहे.
या उल्का वर्षावाला ‘लिओनिड्स’ हे नाव आहे. अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करीत असतांना एकाद्यावेळी क्षणार्धात एकादी प्रकाशरेषा चमकून जाताना आपणास दिसते या घटनेस तारा तुटणे असे म्हणतात. ही एक खगोलीय घटना आहे एखाद्यावेळी उल्का आपल्याला पडताना दिसते, या संदर्भात लोकांच्या अंधश्रद्धा आहे. परंतू अशा अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कोठेही आधार नाही.
सिंह तारकासमुहातून होणारा हा उल्कावर्षाव ‘टेम्पलटटल’ या धूमकेतूच्या अवशेषामुळे होतो व हा धूमकेतू ३३ वर्षांनी सुर्याला भेट देतो. सर्व खगोलप्रेमिंनी उल्का वर्षावाचे विलोभनीय दृष्य पाहावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.
काय आहे उल्कावर्षाव?
धूमकेतू सूर्याला प्रदक्षिणा घालून जात असतांना त्यातील काही भाग मोकळा होतो, धुमकेतूने मागे टाकलेले ते अवशेष असतात. या उल्का एकाद्या तारका समुहातून येत आहेत, असे वाटते. तासाला ६० किंवा त्यापेक्षा जास्त उल्का आकाशातील एकाद्या भागातून पडत असतील तर त्यास उल्का वर्षाव म्हणतात. काही वेळा गतिमान उल्का पृथ्वीच्या वातावरणातून खाली येताना त्या घनरुप अवस्थेत पृथ्वीवर येतात, त्यास ‘अशणी’ म्हणतात, बाह्य अवकाशातील वस्तूचे नमूने या अशणीमुळे मिळतात.