पाणीपुरवठा घोटाळ्यातील आरोपींना चार दिवसांचा पीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:36 AM2019-01-11T01:36:58+5:302019-01-11T01:38:36+5:30
स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या ६३ लाख २२ हजार ६०८ रुपयांचा घोटाळा प्रकरणातील आरोपी विठ्ठल निचळ व अनंत निर्मळ या दोघांना अंजनगाव सुर्जी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अंजनगाव सुर्जी : स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या ६३ लाख २२ हजार ६०८ रुपयांचा घोटाळा प्रकरणातील आरोपी विठ्ठल निचळ व अनंत निर्मळ या दोघांना अंजनगाव सुर्जी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
जिल्हा परिषद पाणीपुरवठा अंतर्गत अंजनगाव सुर्जी पाणीपुरवठा उपविभागातील कनिष्ठ सहायक विठ्ठल निचळ व अनंत निर्मळ अकाउंटंट व खासगी व्यक्ती चंदन पाटील यांनी तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वेतनात लाखोंचा घोळ करून शासनाला लाखो रुपयांनी चुना लावला. याची चौकशी केली असता ते सिद्ध झाल्यानंतर अमरावती लेखा विभागाचे अधिकारी सतीश यांच्या तक्रारीवरून अन्य पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. १० जानेवारी रोजी दोन्ही आरोपींना अंजनगाव सुर्जी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपी विठ्ठल निचळकडून अभियोक्ता पद्माकर सांगोळे व आरोपी अनंत निर्मळकडून किशोर शेळके व आशुतोष देशपांडे यांनी काम पाहिले.
घोटाळ्यातील रक्कम नातेवाइकांच्या खात्यावर
प्रकरणातील आरोपी चंदन पाटील याने घोटाळा उघड झाल्यानंतर संबंधित बेनामी खात्यातील रक्कम निकटच्या नातेवाइकांच्या खात्यात वळती केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
सदर प्रकरणातील आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून, या घोटाळ्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
- नरेंद्र डंबाळे,
ठाणेदार, अंजनगाव सुर्जी