रविवार ठरला अपघात वार; अमरावतीत दोन अपघातांत चिमुकल्यासह पाच ठार, सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 12:24 PM2022-03-27T12:24:39+5:302022-03-27T17:38:02+5:30
अमरावती नागपूर महामार्गासह रहाटगाव रिंगरोडवर झालेल्या दोन भीषण अपघाताच्या घटनेत सहाजण जागीच ठार तर, सहाजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
अमरावती : रविवारचा दिवस जिल्ह्यासाठी अपघात वार ठरला. अमरावती-नागपूर महामार्गासह रहाटगाव रिंगरोडवर झालेल्या दोन भीषण अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला तर सहाजण गंभीररित्या जखमी झाले. मृतांमध्ये आठवर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश आहे.
बडनेरानजीक अंजनगाव बारीहून शिरजगाव कसब्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी चारचाकी वाहन आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात प्रवासी वाहनातील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सहाजण गंभीर जखमी झाले. रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास रहाटगाव रिंग रोडवरील एका हॉटेलसमोर हा भीषण अपघात घडला. त्यापूर्वी पहाटे ४.३० च्या सुमारास मालवाहू वाहन मागून ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले. तो अपघात नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. (six killed, seven injured in two accidents in Amravati)
रहाटगाव रिंग रोडवरील हॉटेलसमोर घडलेल्या भीषण अपघातात रोशन रमेश आखरे (२६), प्रतिभा सुभाष पोकळे (५०, दोघेही रा. अंजनगाव बारी), कृष्णा सचिन गाडगे (८, रा. शिरजगाव कसबा) व गजानन संतोषराव दारोकार (४५, रा. जरुड) यांचा मृत्यू झाला. यातील रोशन हा वाहनचालक-मालक होता, तर जखमींमध्ये विजय भाऊराव पोकळे (५५), ललिता विजय पोकळे (५०), सुभाष भाऊराव पोकळे (६०) सुरेश भाऊराव पोकळे (५८, सर्व रा. अंजनगाव बारी), संगीता गजानन दारोकार (३५, रा. जरुड), रश्मी सचिन गाडगे (३५, रा. जरुड) व पिहू सचिन गाडगे (वय सहा महिने) यांचा समावेश आहे. जखमींना राजापेठ स्थित खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. ट्रकचालक पसार झाला.
घटनास्थळाचे चित्र अत्यंत भयावह
अंजनगाव बारी येथील पोकळे परिवारातील सदस्य शिरजगाव कसबा येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. यासाठी त्यांनी गावातीलच रोशन आखरे या युवकाचे प्रवासी वाहन (एमएच २६ - एए ७९९९) ठरविले. रविवारी सकाळी १० च्या सुमारास या वाहनात बसून चालकासह ११ जण शिरजगाव कसब्याच्या दिशेने निघाले होते.
शहराबाहेरून जाणाऱ्या रहाटगाव रिंग रोडवर हॉटेलसमोर ते वाहन आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये (एमपी ०९ - ५५४९) समोरासमोर धडक झाली. या धडकेत प्रवासी वाहनाचा पूर्णत: चेंदामेंदा झाला. चौघे घटनास्थळीच दगावले. हा अपघात एवढा भीषण होता, की मृतांना ओढून बाहेर काढावे लागले. अपघातस्थळी नांदगाव पेठचे ठाणेदार प्रवीण काळे तथा एसीपी पूनम पाटील, प्रहारचे छोटू महाराज वसू यांनी पोहोचून बचाव कार्य केले.