चार प्रकल्पांची २० दारे उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 01:28 AM2019-08-10T01:28:54+5:302019-08-10T01:29:27+5:30
अचलपूर तालुक्यातील शहानूर, चंद्रभागा, सपन व चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाची दारे शुक्रवारी उघडण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा/चांदूरबाजार/अंजनगाव सुर्जी : अचलपूर तालुक्यातील शहानूर, चंद्रभागा, सपन व चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाची दारे शुक्रवारी उघडण्यात आली.
शहानूर प्रकल्पाची चार दारे ७.५ सेंमीने, चंद्रभागा प्रकल्पाची तीन दारे ४५ सेंमीने, पूर्णा प्रकल्पाची ९ दारे १५ सेंमीने, तर सपन प्रकल्पाची चार दारे ३० सेंमीने उघडल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या पूरनियंत्रण कक्षाने दिली. या चारही प्रकल्पांतून अनुक्रमे २३.०८, १४१.८४, ११२.२० व ९३.२८ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. तूर्तास जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्प व अप्पर वर्धा या मोठ्या प्रकल्पासह पाच प्रकल्पांमध्ये ४३.३४ टक्के जलसंचय झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात दोन टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली.
धरणाचे दरवाजे उघडल्या गेल्यामुळे सपन, चंद्रभागा व शहानूर नदीला पूर आला आहे. यात सपनच्या पाण्यामुळे परतवाडा-चिखलदरा मार्गावरील धोतरखेड्याचा पूल पाण्याखाली आला आहे. सावळी दातुरा लगत सपन नदी पात्रातील वळण रस्ता खोदून काढण्यात आल्यामुळे चिखलदऱ्याकडे व अकोल्याकडे जाणारा मार्ग बंद पडला आहे. चंद्रभागा व शहानूर धरण ८८ टक्के भरले आहे. यात नद्या दुथडी वाहत असल्याने आवक मोठ्या प्रमाणात असल्याने चंद्रभागा धरणाचे तीनही दरवाजे तब्बल ४५ सेंमीने उघडण्यात आले आहेत. सहायक अभियंता आर. एस. मोहिते, कनिष्ठ अभियंता ओमकार पाटील चंद्रभागा धरणावर, तर शाखा अभियंता सुमित हिरेकर शहानूर धरणावर लक्ष ठेवून आहेत. गुरूवारला मध्यरात्रीनंतर रात्री २ ते पहाटे ४ पर्यंत चंद्रभागा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला.
पूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
चांदूर बाजार : तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणात ८२ टक्के जलसंचय झाल्याने धरणाचे संपूर्ण ९ दरवाजे उघडण्यात आले. धरणातून १५० घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे दरवाजे २० सेमीने उघडण्यात आली आहेत. धरणातून वाहणारे पाणी देऊरवाडा, काजळी, ब्राम्हणवाडा थडी, थुगाव पिपरी, निंभोरा, पिंपळखुटा, तोंगलापूर, कुरळपूर्णा या गावातून वाहणाºया नदी नाल्याना मिळत असल्याने सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील भैसदेही, बापूजाई व सावलमेंढा या भागात पावसाचा जोर अद्यापही सुरूच आहे. तसेच चांदूर बाजार तालुक्यात सुध्दा अतिवृष्टी झाली असल्याची नोंद झाली आहे. तहसीलदार उमेश खोडके यांनी शुक्रवार सकाळपासूनच तालुक्यातील नदीकाठच्या गावाना भेटी दिल्या. धरणातील पाण्याचा विसर्ग मुळे गावांना नुकसानीचा आढावा घेतला. मात्र पाणी नदीपात्रात असल्याने कोणत्याही गावांना धोका झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली. २४ तासात तालुक्यात झालेल्या पावसामुळे काही घरांची पडझड झाली आहे. याबाबत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले.