पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोन युवतींचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 11:43 AM2022-06-27T11:43:54+5:302022-06-27T12:06:43+5:30
अमरावती जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून चार युवक-युवतींचा मृत्यू झाला.
अमरावती : अमरावती जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून चार युवक- युवतींचा मृत्यू झाला. त्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोन युवतींचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नांदगाव येथील वडकी प्रकल्पात बुडालेल्या दोन तरुणांचे तर परतवाडा ते धारणी मार्गावरील वझ्झर येथील सपन धरणात रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोन युवतींचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
गायत्री श्रीराम पडोळे (२३, रा. अंबिकानगर, कांडली) व हेमलता जवाहर गाठे (२२, रा. मुगलाई), अशी युवतींची नावे आहेत. मृत दोघी पोलीस भरतीची तयारी करीत होत्या. त्या शनिवारी पहाटे ५.३० वाजता रनिंगकरिता घरून निघाल्या होत्या. दोघींच्या परिजनातर्फे शनिवारी रात्री ९ ते १० वाजेदरम्यान पोलिसांना माहिती देण्यात आली. शोधाशोध घेऊन रविवारी त्यासंदर्भात रीतसर तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम चालविली. सपन धरणातून रविवारी सायंकाळी ७ वाजेदरम्यान दोघींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मृतदेह बाहेर काढून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. दोघींचे पॅन्ट गुडघ्यापर्यंत वर असल्याने हातपाय धुण्यासाठी त्या गेल्या आणि एकमेकींना वाचविण्याच्या तयारीत दोघींचाही बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. घटनेचा तपास ठाणेदार संतोष ताले, पीएसआय बोरसे, खुपिया नाझीम शेख करीत आहेत.
दोन युवतींचे मृतदेह सपन धरणात आढळून आले. दोघी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत होती. एकमेकींना वाचविण्यासाठी दोघी बुडाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास सुरू आहे.
-संतोष ताले, ठाणेदार, परतवाडा
वडकी प्रकल्पात मृतदेह
नांदगाव येथील वडकी प्रकल्पात बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह रविवारी जिल्हा शोध व बचाव पथकाने शोधून बाहेर काढले आहे. अभिषेक कुरळकर (२९, रहाटगाव, अमरावती) व विनय चव्हाण (१९, नवसारी, अमरावती), अशी मृतांची नावे आहेत. या युवकांच्या अचानक मृत्यूमुळे रहाटगाव, नवसारी भागात शोककळा पसरली आहे.
वडकी तलावात रविवारी दुपारी ३ वाजेदरम्यान दोन तरुण बुडाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला मिळाली होती. याआधारे शोध व बचाव पथक दुपारी ३.१५ वाजता घटनास्थळी पोहोचले. पाण्याची खोली ३० फुटांवर व प्रकल्पांचे पात्र मोठे असल्याने पथकाचे गोताखोर यांनी लाइफ बायरिंग व हूक व गळाच्या साहाय्याने शोधकार्य सुरू केले. अर्ध्या तासांत दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.