चार प्रतिष्ठान खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:11 PM2018-05-18T22:11:01+5:302018-05-18T22:11:01+5:30
रायली प्लॉट येथील सतिधाम मंदिरालगतच्या गोवर्धननाथ हवेली स्थित संकुलातील चार व्यापारी प्रतिष्ठाने शुक्रवारी सकाळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या भीषण आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रायली प्लॉट येथील सतिधाम मंदिरालगतच्या गोवर्धननाथ हवेली स्थित संकुलातील चार व्यापारी प्रतिष्ठाने शुक्रवारी सकाळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या भीषण आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन विभागाने वेळेवर घटनास्थळ गाठले. मात्र, बघ्यांच्या गर्दीमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले.
गोवर्धननाथ हवेली नावाने प्रचलित असणाऱ्या जागेवर व्यापारी संकुल आहे. या संकुलातील राजू मिश्रा यांचे कामाक्षी लाइट्स व सोना कलेक्शन नावाचे व्यापारी प्रतिष्ठान आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता मिश्रा यांच्या पत्नी भावना यांनी प्रतिष्ठान उघडताच आगीचे लोळ बाहेर पडले. या घटनेच्या माहितीवरून अग्निशमनने पाण्याचा बंब घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळात अग्निशमन अधीक्षक भरतसिंह चव्हाण व ट्रान्सपोर्ट उपकेंद्रप्रमुख सैय्यद अनवर यांनी पाण्याचे बंब घेऊन रायली प्लॉट परिसर गाठला. मात्र, बघ्यांच्या प्रचंड गर्दीमुळे पाण्याचे बंब आगीच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला. यादरम्यान प्रतिष्ठानातील बहुतांश मुद्देमाल जळून खाक झाला होता. पाण्याच्या ११ बंबांचा वापर केल्यानंतर आग आटोक्यात आली.
घटनेच्या माहितीवरून कोतवालीचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पीएसआय नरेश मुंढे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना पांगवले.
फायरमन जखमी
घराच्या सजावटीसाठी उपयोगी पडणाऱ्या साहित्याचे प्रतिष्ठान, गोडावून, रेडीमेड कपडे व ज्वेलरी शॉप अशी चार प्रतिष्ठाने आगीच्या भक्षस्थानी सापडली होती. भीषण आगीमुळे प्रतिष्ठानातील काचा फुटल्या. आग विझविताना यातील काचा लागून फायरमन प्रेमानंद सोनकांबळे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
सुनील देशमुख यांची भेट
भीषण आगीच्या घटनेच्या माहितीवरून आ. सुनील देशमुख यांनीही घटनास्थळी धाव घेतली. शहराच्या मध्यवस्तीतील व वर्दळीच्या ठिकाणी ही आग लागली होती. त्यातच सतिधाम मंदिरलगतच हे व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. त्यामुळे घटनेचे गांभीर्य पाहता, आ. सुनील देशमुख यांनीही घटनास्थळी भेट दिली.