चार रिव्हॉल्व्हर्समधून झाला गोळीबार
By admin | Published: November 25, 2014 10:47 PM2014-11-25T22:47:17+5:302014-11-25T22:47:17+5:30
चांदणी चौकातील गोळीबार प्रकरणात दरदिवसाला नवनवीन बाबी उजेडात येत आहेत. चार जणांच्या रिव्हॉल्व्हरमधून हा गोळीबार झाला असून दोन्ही टोळीतील चार सदस्यांजवळ रिव्हॉल्व्हर असल्याचे
तक्रारीत उल्लेख : चांदणी चौकातील प्रकरण, आरोपींजवळ तीक्ष्ण शस्त्रेही !
संजय पंड्या - अमरावती
चांदणी चौकातील गोळीबार प्रकरणात दरदिवसाला नवनवीन बाबी उजेडात येत आहेत. चार जणांच्या रिव्हॉल्व्हरमधून हा गोळीबार झाला असून दोन्ही टोळीतील चार सदस्यांजवळ रिव्हॉल्व्हर असल्याचे परस्परविरोधी तक्रारीत नमूद आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी आपले तपासचक्र फिरविले आहे.
स्थानिक चांदणी चौकात रविवारी झालेले गोळीबार प्रकरण दोन टोळीतील वर्चस्वाची लढाई मानली जात आहे. एकाच टोळीत असलेले शेख जफर व अहेफाज हे दोघेही विधानसभा निवडणुकीपासून विभक्त झाले आणि त्यांनी लहान-मोठ्या घटनांवरुन एकमेकांवर वर्चस्व स्ध्दि करण्याचा प्रयत्न चालविला आहे. याची कुणकुण पोलिसांना आधीपासूनच लागलेली होती. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी नागपुरी गेट परिसरातील मतदान केंद्रावर हे दोन्ही गट आमने-सामने येताच प्रतिबंधक उपाय म्हणून पोलिसांनी दोन्ही टोळीतील आठ जणांना ताब्यात घेतले होते. यात शेख जफरसह दुसऱ्या टोळीतील अहेफाजचाही समावेश होता.
दरम्यान, रविवारी घडलेल्या गोळीबार प्रकरणाला शेख नईम व साबीर खान यांच्यातील वाद मुख्य कारणीभूत मानला जात आहे. याप्रकरणी साबीर खानने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तो ट्रक चालक आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता आपल्या मित्रांसोबत तो बसलेला असताना शेख नईम तिथे आला व जुन्या वैमनस्यातून त्याने शिवीगाळ सुरु केली. तसेच साबीरचे वडील इतवारा बाजारात फळविक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनाही भेटून त्याने ‘तुमच्या मुलाला समजावून सांगा’, अशी धमकी दिली.
रविवारी दुपारी २.३० वाजता साबीर खान हा चांदणी चौकात मोहम्मद अहेफाज व सलाउद्दीन यांच्यासोबत टपरीवर चहा घेत असता अचानक एम. एच. २७/३३३ ही स्कार्पिओ उर्दू असोसिएशन कार्यालयाजवळ येऊन धडकली. या वाहनातून १० ते १२ जण उतरले. यातील शेख जफर व श्याम मुंबईय्या या दोघांजवळ रिव्हॉल्वर व अन्य आरोपींजवळ तीक्ष्ण शस्त्रे होती. यातील दोघांनी गोळीबार केल्याचा आरोप साबीर खान याने पोलीस तक्रारीतून केला आहे.
दुसरीकडे शेख नईमने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तो आपल्या वडीलांसोबत फळ विक्रीचा व्यवसाय करतो. शनिवारी सकाळी ११ वाजता तो औषधी खरेदी करण्यासाठी गेला असता तेव्हा साबीरचा सामना झाला. साबीरने त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर दुपारी १२ वाजता तो इलियासच्या पानटपरीवर गेला तेव्हा जावयाचा त्याला फोन आला.