एकाचवेळी निघाल्या चार शवयात्रा
By admin | Published: April 2, 2015 12:22 AM2015-04-02T00:22:09+5:302015-04-02T00:22:09+5:30
सोमवारीच ज्या घरून एक शवयात्रा निघाली होती, त्याच घरून बुधवारी पुन्हा दोन अंत्ययात्रा निघाल्यात.
संजय खासबागे झोलंबा (वरुड)
सोमवारीच ज्या घरून एक शवयात्रा निघाली होती, त्याच घरून बुधवारी पुन्हा दोन अंत्ययात्रा निघाल्यात. शेजारच्या दोन घरून तिरडीवर निपचित पडेलेल्या चिमुकल्यांच्या दोन अंत्ययात्रा आल्यात. या चार सामूहिक अंत्ययात्रेत अख्खा गाव सामिल झाला होता. गावकऱ्यांनी स्वप्नातही न कल्पिलेले दु:खाची परिसिमा गाठणारे हे दृष्य उपस्थित हरेक काळजाला पाझर फोडून गेले.
चारही मृतदेह एका ठिकाणी आलेत नि भयावह आक्रोश झाला. तीन चिमुकले नि एका तरुणाचे कलेवर नेताना होणाऱ्या वेदना शब्दातित होत्या. घटनेनंतर गावात तैनात झालेल्या अधिकाऱ्यांच्याही डोळ्यांनाही धारा लागल्या होत्या. काय करावे, कुणालाच काही सुचेनासे झाले होते. अवघा झोलंब गाव हमसून-हमसून रडत होता. वृद्ध असो वा लहान, कुणालाही अन्नाचा घास घशाखाली उतरला नाही. गावात चूलच पेटली नाही.
गावात स्मशान शांतता आणि स्मशानात अख्खा गाव अशी स्थिती निर्माण झाली होती. जणू घटना आपल्याच घरी घडली असावी, अशा वेदनांनी गावकरी विव्हळत होते. कुणाच्याच तोंडी शब्द नव्हते. होते ते केवळ हुंदके.अंत्ययात्रेत सहभागी न झालेल्या बायाबापड्यांचा दूरूनच हृदय पिळवटणारा आक्रोश करीत होत्या.
घराघरात आरोग्यदूत
घटना घडताच आरोग्यसेविका घरोघरी दाखल झाल्या. कुणाला ताप, खोकला अशी लक्षणे तर नाहीत ना, कुणी आजारी तर नाहीत ना, आदी नोंदी त्यांनी घेतल्या.
पतीपाठोपाठ गेला मुलगाही !
४झोलंबा येथे किशोर नेहारे यांच्या कुटुंबात चौथ्या वर्गात शिकणारी मोहिनी, पहिल्या वर्गात शिकणारी राखी आणि अंगणवाडीत जाणारा तीन वर्षांचा जय असे सदस्य कुटुंबप्रमुख असलेल्या किशोर यांचे दोन महिन्यांपूर्वीच अपघाती निधन झाले. म्हातारी सासू आणि तीन मुलांचा सांभाळ ललीताबाई मोलमजुरी करुन करीत होत्या. कालच्या दुर्दैवी घटनेने चिमुकला जय काळाने हिरावून नेला. इवल्याशा मुलाच्या अशा जाण्याने कुटुंबीयांनी रडून रडून आकाश पाताळ एक केले.
पोटचे दोन्ही गोळे गेले!
रामभाऊ नेहारे यांना दोन मुले. मोठा रितेश आणि लहान सतीश. या दोघांशिवाय पत्नी आशाबाई कुटुंबात आहेत. आशाबार्इंनी गव्हाचा चिक्का केला. त्यातून उरलेल्या आम्लयुक्त पाण्यात पीठ कालवून धापोडे केले. त्या माऊलीस काय खबर की, ज्यांच्यासाठी हे खाद्यपदार्थ केलेत, त्यांच्याच ते जीवावर उठतील. रविवारी २५ वर्षीय रितेशने आई कुरडया काढत असताना त्यातील कुरडी खाल्ली आणि प्रकृती ढासळली. त्याला खासगी दवाखान्यात मोर्शीला दाखल केले. परंतु वेळ अटळ होती. वडिलांच्या डोक्यावर हात ठेवून रितेश म्हणाला होता, ‘बाबा मी जातो.' त्यानंतर मंळवारी लहाना सतिष आईबाबांना सोडून गेला. ज्यांच्या उमेदीचे दिवस होते ते दोघेही निघून गेले. घरात आता राहिले ते केवळ पती-पत्नी.
शवविच्छेदनाकरिता विशेष पथक
विषबाधेमुळे चार लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल प्रशासनाने घेतली. शल्यचिकित्सक, न्यायवैद्यक अधिकारी, बालरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञांच्या विशेष पथकाने मृतांचे अमरावतीत शवविच्छेदन केले.
कुरडई खाल्लेला
कुत्राही दगावला !
कुरडयांचा खाली पडलेला चुरा एका कुत्र्याच्या पिल्लाने खाल्ला. तो कुत्राही दगावला. एका बकरीनेही या कुरडया खाल्ल्या होत्या. ती मात्र बचावली.
कुरडया, पीठ, तिखट, मिठाचे नमुने
आरोग्य विभागाने रामभाऊ नेहारे यांच्याकडील कुरडया, पीठ, तिखट, मीठ आणि पाण्याचे नमुने घेतले. ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. नेमकी विषबाधा कशामुळे झाली, याचा शोध घेण्यात येत आहे.
नागपूर जिल्ह्यातील खापरीतही शोककळा
काटोल तालुक्यातील खापरी येथून आलेल्या परसे परिवरातील आदर्श आणि कोमल परसे या बहीण-भावांनासुध्दा विषबाधा झाली. यातील आदर्शचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोमलवर अमरावतीला उपचार सुरू आहेत. अंत्यसंस्कारांचे सोपस्कार आटोपल्यांनतर वडीलांनी दोन्ही मुलांना गावी चालण्याचा आग्रह धरला होता. मात्र दोन दिवस थांबावे म्हणून कुटुंब मुक्कामी राहिल्याने नि विषबाधेचे संकट कोसळले.