पालकमंत्र्यांच्या निवासी क्षेत्रात चार घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:34 PM2017-10-28T23:34:36+5:302017-10-28T23:34:49+5:30

राज्याचे सार्वजनिक बांधकाम, उद्योग व पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचे निवासस्थान असलेल्या राठीनगर परिसराला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घरफोड्यांच्या टोळीने लक्ष्य केले आहे.

Four house-breaks in the resident area of ​​Guardian Minister | पालकमंत्र्यांच्या निवासी क्षेत्रात चार घरफोड्या

पालकमंत्र्यांच्या निवासी क्षेत्रात चार घरफोड्या

Next
ठळक मुद्दे राठीनगर परिसराला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घरफोड्यांच्या टोळीने लक्ष्य केले आहे.

अमरावतीकर असुरक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्याचे सार्वजनिक बांधकाम, उद्योग व पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचे निवासस्थान असलेल्या राठीनगर परिसराला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घरफोड्यांच्या टोळीने लक्ष्य केले आहे. येथून साडेसात लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. जिल्ह्याचे पालकत्व असलेल्या मंत्र्यांचाच परिसर सुरक्षित नसेल, तर सामान्य अमरावतीकरांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शनिवारी पहाटे उघड झालेल्या चार घरफोड्यांच्या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी स्वतंत्र फिर्याद दाखल करून तपास सुरू केला. उच्चभ्रू वस्तीत गणल्या जाणाºया राठीनगर परिसरात पालकमंत्री पोटे यांचे निवासस्थान असल्याने या संपूर्ण परिसराला कडेकोट सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. येथे गाडगेनगर पोलिसांसह खुपियांची नियमित रात्रकालीन गस्त असते. मात्र, या सुरक्षेला वाकुल्या दाखवत आणि थेट पालकमंत्र्यांना आव्हान देत चोरट्यांनी शुक्रवारी राठीनगरचे ‘टार्गेट’ यशस्वी केले. येथील रहिवासी सुधीर धनराज बारबुद्धे, ललित भीमराव जावरकर, अरुणा पोतदार व दिलीप बोंडे यांची घरे चोरट्यांनी फोडली.
संगणक व्यवसायातील सुधीर बारबुद्धे, पत्नी अर्चना व १२ वर्षीय मुलगा अमन बेडरूममध्ये झोपले होते. हॉलमधील खिडकीच्या ग्रिलचे नटबोल्ट काढून चोरांनी बारबुद्धेंच्या घरात प्रवेश केला आणि आलमारीचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचा ऐवज व २० हजारांची रोख असा तीन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. विशेष म्हणजे, चोरट्यांनी बेडखालील बॅग व्हरांड्यात आणली तेव्हा या कुटुंबाला कसलीही चाहूल लागली नाही. सुधीर बारबुद्धे पहाटे ४.३० वाजता झोपेतून उठल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. गाडगेनगर पोलिसांकडून पंचनामा सुरू असतानाच शेजारच्या ललित जावरकर यांनीही घरात चोरी झाल्याची तक्रार नोंदवली. चोरट्यांनी बेडरूमचे ग्रील काढून घरातून सोन्या-चांदीचा व रोख असा एकूण ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल चोरून नेले. यादरम्यान शेजारी राहणारे अरुणा पोतदार व दिलीप बोंडे यांचेही घरात चोरी झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोतदार हे मुंबई, तर बोंडेचे कुटुंबीय हे बंगलोरला राहतात. त्यामुळे येथून किती मुद्देमाल चोरीस गेला, ही बाब स्पष्ट शकली नाही. पोलिसांचे श्वानपथक काही अंतरावर जाऊन घुटमळले.

शुक्रवारी तीन घरफोड्या उघड
राठीनगरातील घरफोड्यांपूर्वी शहरात गुरुवारी रात्री तीन घरफोड्या उघड झाल्या. खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील पुष्पक कॉलनीत राहणारे कैलास गयाप्रसाद श्रीवास यांचे कुटुंबीय बाहेर गेले होते. चोरांनी दाराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचा व रोख असा एकूण १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. राजापेठ हद्दीतील पोलीस कॉलनी राहणारे नारायण मारुती आखरे हे यवतमाळ गेले होते. चोरांनी येथून १० हजारांचा ऐवज लंपास केला. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्री यादगीरे येथे प्रदीप भागवत गोळे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरांनी ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित कैद
राठीनगरातील रहिवासी सुधीर बारबुद्धे यांच्या घराजवळच माजी महापौर किरण महल्ले राहतात. त्यांच्या घरावर लागलेल्या सीसीटीव्हीत मध्यरात्रीच्या सुमारास फिरत असलेले दोन संशयित कैद झालेत. त्यांच्या वर्णनावरून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या दोन्ही संशयित इसमांच्या कुटुंबातील महिलांनी पोलीस आयुक्तालय गाठून गोंधळ घातला होता.

दागिन्यांची किंमत दाखविली जाते कमी
घरफोडी किंवा चोरीच्या घटनांमध्ये चोरी गेलेल्या सोन्या-चांदीचे दर पोलिसांकडून कमी दाखविले जातात. राठीनगरात घडलेल्या चोरीमध्येही पोलिसांनी साडेचार लाखांपर्यंत सोन्या-चांदीचे दागिने चोरी झाल्याचे नमूद केले आहे. मात्र, हा मुद्देमाल आजच्या दरानुसार सात ते आठ लाखांच्या घरात आहे. पोलिसांनी नमूद तक्रारीत दागिन्यांचे दर कमी दाखविल्याने तक्रारकर्तेही संभ्रमात पडले आहेत.

गुंगीचा स्पे्र वापरल्याची शक्यता
बारबुद्धे कुटुंबीय घरात असतानाच चोरट्यांची बेडरूमपर्यंत मजल गेली. त्यांचा मुलगा शनिवारी सकाळी उशिराच उठला. हा गुंगीच्या स्प्रेचा प्रभाव असावा, असा संशय बारबुद्धे कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

एका घरावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन इसम आढळले. यावरून दोन संशयितांची चौकशी सुरू आहे. अशा पद्धतीचे गुन्हे करणाºया रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.
- चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त
 

Web Title: Four house-breaks in the resident area of ​​Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.