शेतमजुरांवर बिबट्याचा हल्ला, चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 04:46 PM2021-12-15T16:46:44+5:302021-12-15T17:29:56+5:30
शेतात कापूस वेचताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने महिलेवर अचानक हल्ला केला. यात दोन महिला, एक शेतकरी व एक वन कर्मचारी जखमी झाले.
अमरावती : शेतात कापूस वेचताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून चौघांना जखमी केले. जखमींमध्ये दोन महिला, एक शेतकरी व एक वन कर्मचाऱ्याचा समावेश आहे. ही घटना नांदगाव पेठ शिवारात संगमेश्वर रस्त्याजवळील जाधव यांच्या शेतात बुधवारी सकाळी १०.३० दरम्यान घडली. या परिसरातील ही पहिलीच घटना असल्याने रमाकांत जयस्वाल म्हणाले.
नागपूर हायवेनजीनक संगमेश्वर रस्त्यावर दुचाकी शोरूमचे संचालक राजाभाऊ जाधव यांचे शेत आहे. नांदगाव पेठ येथील रमाकांत जयस्वाल यांनी ते सहा एकर शेत लागवणने केले आहे. बुधवारी सकाळी ९वाजता कापूस वेचणीकरिता मजूर शेतात आले होते. सर्व महिला मजूर कापूस वेचत असल्याने एचानक पऱ्हाटीच्या झाडाखाली दबा धरून बसलेल्या महिलेवर हल्ला केला. आरडाओरड झाल्याने तो पळाला. मात्र, भीती कायम राहिल्याने काहींनी गावातून फटाके आणून फोडले.
वनविभागाला याची माहिती देण्यात आली. अवघ्या २० मिनिटात पोहरा चिरोडी बिटचे वनकर्मचारी ताफ्यासह दोन वाहन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तेवढ्यात बिबट पुन्हा दिसला. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात शेतकरी एक वनकर्मचारी आणि शेतकरी विवेक रमाकांत जयस्वाल (३०) हा जखमी झाला. बिबट चवताळ्याने त्याला ट्रँगुलाईझ करून वनकर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यात कैद केले नि वडाळी बिटमध्ये आणून ठेवले आहे.
अडीच वर्षांचा बिबट भरकटला
नांदगाव शिवारात आतापर्यंत बिबट आढळल्याचे ऐकिवात नाही. मात्र, अचानक ही घटना पहिल्यांदाच घडली. २ ते अडीच वर्षांचा तो बिबट शिकार करण्याच्या नादात या परिसरात भरकटला असावा, असा कयास वनकर्मचाऱ्याने वर्तविला.
एकाचा इर्विनमध्ये उपचार सुरू
नांदगाव पेठ येथील बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिलेसह एक युवक जखमी झाला. मात्र, महिलांना किरकोळ जखम असल्याने प्राथमिक उपचाराअंती सुटी देण्यात आली असून, विवेक जयस्वाल यांच्या दोन्ही हाताला, छातीवर व पाठीवर जखम असल्याने उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.