गाडीच्या डिक्कीतून चार लाख लंपास फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:13 AM2020-12-22T04:13:49+5:302020-12-22T04:13:49+5:30
परतवाडा : स्थानिक बस स्थानकासमोरून दुचाकीच्या डिक्कीतील चार लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळविली. २१ डिसेंबरला दुपारी ३.३० च्या सुमारास ...
परतवाडा : स्थानिक बस स्थानकासमोरून दुचाकीच्या डिक्कीतील चार लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळविली. २१ डिसेंबरला दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडली.
शहराला लागून असलेल्या देवमाळी येथील सेवानिवृत्त कर्मचारी अशोक ठाकरे (६०) यांनी सोमवारी भारतीय स्टेट बँकेच्या कृषी शाखेतून चार लाख रुपये काढले. बँकेतून बाहेर येऊन त्यांनी ती रक्कम एम.एच. २७ सीजी १६९९ क्रमांकाच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेत. यावेळी दोन युवकांनी पुढे होऊन त्यांना दुचाकी पंक्चर असल्याचे सांगितले. बस स्थानकापुढील पेट्रोल पंपालगत पंचर दुरुस्तीसाठी दुचाकी उभी केल्यानंतर त्यांनी डिक्की तपासली असता, रक्कम त्यात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुचाकीला चार ते पाच पंक्चर होते. ठाकरे यांनी मुलाच्या फ्लॅटच्या खरेदीकरिता ही रक्कम काढली होती.
अशोक ठाकरे यांनी परतवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, पण, त्यांच्या हाती काहीही लागले नाही. याप्रकरणात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.