चार लाख क्विंटल तूर घरात पडून
By admin | Published: May 2, 2017 12:37 AM2017-05-02T00:37:23+5:302017-05-02T00:37:23+5:30
शेतकऱ्याजवळील अखेरचा दाणा खरेदी करण्याचे आश्वासन देणाऱ्या शासनाने अर्ध्यावर डाव मोडला. सरकारी तूर खरेदी केंद्र बंद केलेत.
दैना : शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मरण होत असल्याचा आरोप
अमरावती : शेतकऱ्याजवळील अखेरचा दाणा खरेदी करण्याचे आश्वासन देणाऱ्या शासनाने अर्ध्यावर डाव मोडला. सरकारी तूर खरेदी केंद्र बंद केलेत. मोजणीच्या प्रतीक्षेत महिन्याभरापासून यार्डात पडून असलेल्या अडीच लाख पोते तुरीची दैनावस्था झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरी चार लाख क्विंटलवर तूर पडून असल्याने जगावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना अस्वस्थ करीत आहे.
गतवर्षीच्या खरिपात तुरीसाठी एक लाख १४ हजार ९९५ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना प्रत्यक्षात एक लाख ३४ हजार ४३९ हेक्टरमध्ये तुरीची पेरणी झाली व समाधानकारक पाऊस असल्याने तुरीची सरासरी ११.५६ क्विंटल इतकीच उत्पादकता राहिली. म्हणजेच जिल्ह्यात १५.५० लाख क्विंटल तुरीचे उत्पादन झाले. तुरीच्या हंगामापूर्वीच भाव कोसळले. तीन हजार रूपये क्विंटल याप्रमाणे व्यापाऱ्यांनी तुरीची खरेदी केली. २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत नाफेडचे १० तूरखरेदी केंद्र सुरू करण्यात आले. प्रत्यक्षात व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात शेतकऱ्यांजवळून कवडीमोल दराने खरेदी केलेल्या तुरीची केंद्रावर ५०५० रूपये हमीभावाने शेतकऱ्यांच्या नावाआडून विक्री केली. विशेष म्हणजे बाजार समिती व खरेदी यंत्रणांच्या सहकार्याने शासनाला करोडो रूपयांचा चूना लावण्यात आला. शासनाला अखेर जाग आली. मात्र, तोवर व्यापारी तुरीची विक्री करून मोकळे झाले.या पार्श्वभूमिवर शासनाने २२ एप्रिलपासून सर्व तूर खरेदी केंद्र बंद केलेत. या दिनांकापर्यंत केंद्रावर नोंद झालेल्या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या घरी चार लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर पडून आहे. यंदाचा खरीप महिन्यावर आला आहे. तूर खरेदी केंद्र बंद व खुल्या बाजारात कवडीमोल भाव यामुळे शासनाचे धोरण हेच शेतकऱ्याचे मरण ठरत असल्याचा आरोप सर्वत्र होत आहे. (प्रतिनिधी)
बाजार समितीत ११.२० लाख क्विंटल आवक
धारणीसह जिल्ह्यातील १० बाजार समित्यांमध्ये केंद्र बंद होण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ११.२० लाख क्विंटल तुरीची आवक झाली. जिल्ह्याची तूर उत्पादकता १५.४१ लाख क्विंटल असल्याने किमान ४.३४ लाख क्विंटल तूर अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. केंद्र बंद झालीत. खुल्या बाजारात कवडीमोल भाव यामुळे शेतकऱ्यांसमोर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
घरातली तूर देखील कवडीमोल भावाने जाणार
यंदाचा खरीप महिन्यावर आला आहे. शेतकरी बँकांचे थकबाकीदार असल्याने पुन्हा कर्ज मिळण्यात अडचणी आहेत. मुलांचे शिक्षण, लग्न व पेरणी कशी करावी याची विवंचना आहे. अशा स्थितीत भाववाढीच्या आशेने राखून ठेवलेली तूर देखील कवडीमोल भावाने विकली जाणार, अशी स्थिती आहे.
बाजार समित्यांवर कारवाई करा
बाजार समिती अधिनियम १९ अन्वये मार्केट यार्डात हमीपेक्षा कमी भावाने खरेदी होत असेल तर बाजार समितीने हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांना हमीदराने माल घेण्यास बाध्य करावे. मात्र, असे होत नसल्याने शासनाने कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
दिवाळीतच येतो उत्पादनाचा अंदाज, शासनाचे नियोजन चुकले
वास्तविकत: यंदा तुरीचे उत्पादन किती होणार याचा अंदाज तूर फुलोरावर असताना दिवाळीतच येतो. शेतकऱ्यांना हा अंदाज येऊ शकतो तर शासनाला का येत नाही, हा प्रश्न आहे. मुळात तुरीच्या उत्पादनाचा आढावा घेण्यास व त्याचे नियोजन करण्यात सरकार कमी पडले. त्यामुळे शेतकऱ्यांची दैना झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.