चारचाकी वाहन अडवून चार लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:20+5:302021-07-15T04:11:20+5:30
अपघात घडल्याचा बहाणा, बॅग हिसकली, मोर्शी-अमरावती मार्गावर येरला येथे भरदिवसा घटना मोर्शी (अमरावती) : अमरावती-मोर्शी रोडवरील येरला येथे हनुमान ...
अपघात घडल्याचा बहाणा, बॅग हिसकली, मोर्शी-अमरावती मार्गावर येरला येथे भरदिवसा घटना
मोर्शी (अमरावती) : अमरावती-मोर्शी रोडवरील येरला येथे हनुमान मंदिराजवळ भरदिवसा अज्ञात चार दुचाकीस्वारांनी पिकअप वाहन अडवून चार लाख रुपये लंपास केल्याची घटना १४ जुलै रोजी भरदुपारी घडली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे तसेच गुन्हे शाखेच्या चमूने तपास सुरू केला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, अमरावती शहरातील कॉटन मार्केट परिसरातील आकाश एजन्सीचे संचालक तथा किराणा व्यवसायिक बंटी वसंतवाणी यांच्या दुकानातून चिल्लर किराणा माल, गोळ्या, माचिस पुडा, चुन्याच्या डब्या तसेच इतर किराणा माल घेऊन एमएच २७ बीएक्स ४७०७ क्रमांकाचे वाहन वरूड येथे गेले होते. तेथील विविध व्यापाऱ्यांना माल देऊन व त्यांच्याकडून रोकड घेऊन अमरावतीच्या दिशेने चालक मोहम्मद जुनेद अब्दुल रशीद (३०, रा. अकबरनगर, अमरावती) हा निघाला होता. मोर्शी शहरानंतर येरलानजीक असलेल्या हनुमान मंदिराजवळ मोर्शीवरून अमरावतीकडे जाणाऱ्या आठ अज्ञात स्वारांनी वाहनापुढे त्यांच्या चार दुचाकी टाकल्या. त्यापैकी चौघांनी मोहम्मद जुनेदला बाहेर ओढून मारहाण सुरू केली. तुझ्या गाडीने अपघात झाल्यावर गाडी का थांबवली नाही, असे बोलून दोघांनी वाहकाला मारहाण करून ताब्यातील रोकड असलेली बॅग हिसकली व अमरावतीच्या दिशेने दुचाकीने पळ काढला. चालक-वाहक रस्त्यावर पडून असल्याचे पाहून नागरिकांनी गर्दी केली. एका व्यक्तीने मोबाईलवरून तातडीने मोर्शी पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक संजय सोळंके व त्यांच्या चमूने घटनास्थळी दाखल होऊन जखमींना पोलीस ठाण्यात आणले. मोर्शी पोलिसांनी सदर माहिती जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेला दिली. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.