परतवाडा-अमरावती महामार्गाचे चौपदरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:00 AM2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:01:03+5:30
परतवाडा-अमरावती मार्गावर जड आणि प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अमरावतीनंतर दर्यापूर, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चिखलदरा, धारणी या जिल्ह्यातील तालुक्यांसह अकोट, अकोला व मध्यप्रदेशातील बैतूल, बऱ्हाणपूर, खंडवा, इंदूरसाठी रात्रंदिवस वाहतूक सुरू राहते. अनेक वर्षांपासून या आंतरराज्य महामार्गाच्या कामाला अडथळे येत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : जिल्ह्यात सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या परतवाडा-अमरावती महामार्गाच्या चौपदरीकरणास अखेर सुरुवात होणार आहे. येत्या वर्षभरात ६०० कोटी रुपये खर्चून हा महामार्ग चौपदरी होईल.
परतवाडा-अमरावती मार्गावर जड आणि प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अमरावतीनंतर दर्यापूर, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चिखलदरा, धारणी या जिल्ह्यातील तालुक्यांसह अकोट, अकोला व मध्यप्रदेशातील बैतूल, बऱ्हाणपूर, खंडवा, इंदूरसाठी रात्रंदिवस वाहतूक सुरू राहते. अनेक वर्षांपासून या आंतरराज्य महामार्गाच्या कामाला अडथळे येत होते. त्यामुळे प्रलंबित राहिलेल्या या रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम गत आठवड्यात पूर्ण झाले आहे. दिवाळीनंतर या कामाच्या निविदा काढण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने चालविली आहे. त्यासाठी या एकूण ५४ किलोमीटर अंतराचा रस्त्यावर कुठे काय घ्यायचे, याचा आराखडा बनविला जात आहे. एकंदर येत्या सहा ते आठ महिन्यांत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे
या कामाला कोरोनामुळे लॉकडाऊन होण्याची वेळ आली. परिणामी उशिरा का होईना मात्र, वर्षाच्या शेवटी कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. अमरावती ते अचलपूर नाका, परतवाडा शहरातील जयस्तंभ चौकपर्यंत सर्वेक्षण झाले होते. परंतु, धारणी, बऱ्हाणपूर, खंडवा या मार्गाचा विचार करता मल्हारानजीकच्या बुरडघाटपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे नऊ किलोमीटर अंतराचा हा मार्ग अतिरिक्त समाविष्ट करण्यात आला आहे.
अमरावती ते परतवाडापर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम आता नऊ किलोमीट बुरडघाटपर्यंत वाढविले आहे. खासगी बँकेच्या अर्थसाहाय्याने काम होणार आहे. सर्वेक्षण झाले असून तपासणी होताच दिवाळीनंतर निविदा काढली जाईल. कोरोनामुळे कामाला विलंब झाला.
- चंद्रकांत मेहत्रे,
कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग, अचलपूर
खासगी बँकेच्या कर्जातून होणार रस्ता
बुरडघाट परतवाडा-अमरावती या आंतरराज्यीय महामार्गासाठी ६०० कोटींचा खर्च अपेक्षित असून खासगी बँकेच्या अर्थसहाय्यातून सदर काम होणार आहे. संपूर्ण रस्ता डांबरीकरणाचा राहणार आहे. वलगाव, आष्टी, पूर्णानगर, आसेगाव, बोरगाव पेठ, भूगाव आदी गाव तेथे काँक्रीटीकरण होईल. त्यामुळे एकूण ५४ किलोमीटरपैकी १० किलोमीटरचा रस्ता काँक्रिटीकरणाचा राहणार आहे. रस्त्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून डीपीआर सबमिशन झाले त्याची तपासणी होऊन दिवाळीदरम्यान निविदा निघण्याची शक्यता आहे.