चार परवाने रद्द, ५४ निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 01:23 AM2019-05-25T01:23:15+5:302019-05-25T01:23:36+5:30
औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चार मेडिकल स्टोअरचे परवाने रद्द करण्यात आले. ५४ परवाने निलंबित झाले, तर ६४ व्यावसायिकांना शो-कॉज नोटीस बजावण्यात आली आहे. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी ६३१ मेडिकल स्टोअरच्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
वैभव बाबरेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चार मेडिकल स्टोअरचे परवाने रद्द करण्यात आले. ५४ परवाने निलंबित झाले, तर ६४ व्यावसायिकांना शो-कॉज नोटीस बजावण्यात आली आहे. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी ६३१ मेडिकल स्टोअरच्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
औषध प्रशासन विभागाकडे नोंदणीकृत परवानाधारकांची संख्या १ हजार ७८७ आहे. त्यामध्ये घाऊक ३९०, तर किरकोळ १ हजार ४५४ मेडिकल स्टोअर आहेत. औषधविक्री करणाºया या मेडिकल स्टोअरमध्ये नोंदवही, फार्मसिस्ट, औषधी खरेदी-विक्रीच्या नोंदी, फ्रीज, ग्राहकांना पावती आदी नियमावलींचे पालन करणे बंधनकारक असते. मात्र, अनेकदा मेडिकल स्टोअर संचालक त्या नियमांचे पालन करीत नाही. ही बाब तपासण्याची जबाबदारी औषध प्रशासन विभागाचे अधिकारी सांभाळतात. ते प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन तपासण्या करतात. औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सी.के. डांगे यांच्या मार्गदर्शनात औषध निरीक्षक उमेश घरोटे व मनीष गोतमारे यांनी एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान जिल्ह्यातील तब्बल ६३१ मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन नियमित तपासणी केली. त्यामध्ये गंभीर त्रुटी आढळून आलेल्या चार मेडिकल स्टोअरचे परवाने रद्द करण्यात आले, तर ५४ परवाने निलंबित झाले आहेत. ६४ मेडिकल स्टोअर संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाई झालेल्या काही मेडिकल व्यावसायिकांनी वरिष्ठ स्तरावर अपिलसुद्धा केलेली आहे.
३३ न्यायालयीन खटले
औषधी प्रशासनाने आजपर्यंत केलेल्या विविध कारवायांतून ३३ न्यायालयीन खटले दाखल झाले आहेत. या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.