चार मोठे प्रकल्प शंभर टक्क्यांच्या वाटेवर; नऊ मोठ्या प्रकल्पांना ८२.८४ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 05:58 PM2020-08-17T17:58:17+5:302020-08-17T17:58:32+5:30

पश्चिम विदर्भात दमदार पाऊस

Four major projects one hundred percent on track; 82.84 per cent water storage for nine major projects | चार मोठे प्रकल्प शंभर टक्क्यांच्या वाटेवर; नऊ मोठ्या प्रकल्पांना ८२.८४ टक्के पाणीसाठा

चार मोठे प्रकल्प शंभर टक्क्यांच्या वाटेवर; नऊ मोठ्या प्रकल्पांना ८२.८४ टक्के पाणीसाठा

Next

- संदीप मानकर

अमरावती : गत तीन ते चार दिवसांपासून पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी चार सिंचन प्रकल्प शंभर टक्क्यांच्या वाटेवर आहेत, तसेच नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ८२.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

अमरावती जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेला ऊर्ध्व वर्धा प्रकल्पांत ९३.९० टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात सर्वाधिक ९६.६६ टक्के पाणीसाठा आहे. बेंबळा प्रकल्पात ९१.७२ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ८९.९० टक्के पाणीसाठा आहे. सदर चार प्रकल्प लवकरच शंभरी गाठतील, असा विश्वास जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची सुविधेचा प्रश्न मिटला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती प्रकल्पात ५५.३३ टक्के पाणीसाठा आहे. अकोेला जिल्ह्यातील वान सिंचन प्रकल्पात ४६.३७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ५९.८८ टक्के, पेनटाकळी ८२.६९ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात ७७.५७ टक्के पाणीसाठा आहे. 

चार धरणातून नदीपात्रात विसर्ग

यंदा परतीचा दमदार पाऊस कोसळत असल्याने चार धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहेत. यामध्ये ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे पाच दरवाजे १५ सेंमीने उघडण्यात आले. यवतमाळ  जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे २० सेंमीने उघडण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेंमीटरने, तर खडकपूर्णा प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरण परिसरात काही हौशी पर्यटकांनीसुद्धा गर्दी केली आहे. 

आठ मध्यम प्रकल्पांनी गाठली शंभरी

पश्चिम विदर्भातील २५ मध्यम प्रकल्पांत सरासरी ७६.०८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये आठ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामुळे त्या त्या जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, बोरगाव, नवरगाव, वाशिम जिल्ह्यातील सोनल, एकबुर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील मस, उतावळी, अकोला जिल्ह्यातील मोर्णा  आदी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. चार प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Web Title: Four major projects one hundred percent on track; 82.84 per cent water storage for nine major projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.