हळद विक्रीत चार कोटींची फसवणूक; गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:19 PM2018-04-20T22:19:41+5:302018-04-20T22:19:41+5:30
तिप्पट रकमेचे प्रलोभन : नांदगाव खंडेश्वर, कुहृयात तक्रारी; एकास अटक, तिघे पसार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती/कुऱ्हा : जिल्हाभरात हळद खरेदी-विक्रीच्या घोळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाºया कंपूविरोधात नांदगाव खंडेश्वर व कुऱ्हाहा पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतले, तर तीन आरोपी फरार आहेत.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली (चोर) येथे पंकज सुरेश देशमुख (रा. वंदन लेआऊट, अमरावती) यांचे नऊ एकर शेत आहे. त्यांनी यावर्षी ६१ क्विंटल ७४ किलो हळदीचे उत्पादन घेतले. नांदगाव येथील वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेली ही हळद कृषी समृद्ध कंपनीचे साहेबराव लव्हाळे (६८, रा. ढंगारखेडा ता. कारंजा लाड) यांनी ९ लाख ५ हजारांत ती विकत घेतली. सौद्यातील रक्कम अमरावती येथे देण्याचे ठरले. अमरावतीच्या पन्नालाल नगर येथे वास्तव्यास असलेल्या लव्हाळेकडे देशमुख यांनी पैशांचा तगादा लावला तेव्हा उडवाउडवीची उत्तरे मिळाली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देशमुख यांनी नांदगाव पोलिसांत साहेबराव लव्हाळेसह तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात साहेबराव लव्हाळे याला अमरावती येथून ताब्यात घेण्यात आले.
कुºहा परिसरातील मौजा बाळापूर व जामठी शिवारात फसवणूक झालेले शेतकरी सुभाष शेषराव गोहत्रे (६४, रा. जवाहरनगर, अमरावती) यांचे शेत आहे. श्रीधर केशवराव हुशंगाबादे (रा. अमरावती), अतुल साहेबराव लव्हाळे (३७) व पद्माकर मोकोशे (दोघेही रा. ढंगारखेड ता. कारंजा लाड) अशी आरोपींची नावे आहेत. सुभाष गोहत्रे यांच्याकडे २०१४ मध्ये श्रीधर हुशंगाबादे याने संपर्क केला. आम्ही हळदीच्या चालू भावाच्या तिप्पट रक्कम एक वर्षानंतर देतो, असे आमिष दाखवून सुभाष गोहत्रे यांच्याकडून ६२० क्विंटल हळद विकत घेतली. याशिवाय शेजारी शेत असलेले विक्रम विलास पाटील यांच्याकडून ४५ क्विंटल हळद घेतली. त्याची किंमत २ कोटी १ लाख ४१ हजार ५०० रुपये ठरली. तेव्हापासून आरोपी काही ना काही कारणे सांगून पैसे टाळत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. १९ एप्रिल रोजी कुºहा पोलीस ठाण्यात श्रीधर हुशंगाबादे, अतुल साहेबराव लव्हाळे व पद्माकर मोकोशेविरोधात तक्रार दाखल केली. कुºहा पोलिसांनी भादंविचे कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध ठाणेदार सुनील किणगे, पीएसआय प्रणित पाटील व नायक देवानंद गुडधे करीत आहेत.
परतवाडा पोलीस ठाण्यातही तक्रार
परतवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी उशिरा रात्री याच प्रकरणात राजेंद्र रामराव ढवळे (५२, रा. तांबेनगर, परतवाडा) यांनी अतुल लव्हाळे, साहेबराव लव्हाळे, गायत्री अतुल लव्हाळे (३२) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. आरोपींनी त्यांच्यासह इतरांकडून २९ लाख ५० हजार रुपये नेले. शिरखेड ठाण्यात चौघांविरुद्ध महेश विठ्ठलराव हिवसे यांनी १ कोटी ७१ लाख ७४ हजारांनी फसवणूक केल्याची तक्रार गुरुवारी नोंदवली आहे.