चार मिनिटे आॅनलाईन मूल्यांकन अनिवार्य, अमरावती विद्यापीठाचा निर्णय, प्राध्यापकांना सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 04:55 PM2017-09-25T16:55:32+5:302017-09-25T16:55:36+5:30
मुंबई विद्यापीठाच्या निकालांमध्ये झालेल्या गोंधळानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आॅनलाईन मूल्यांकनासाठी संबंधित प्राध्यापकांना चार मिनिटांचा कालावधी अनिवार्य केला आहे.
- गणेश वासनिक
अमरावती, दि. २५ - मुंबई विद्यापीठाच्या निकालांमध्ये झालेल्या गोंधळानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आॅनलाईन मूल्यांकनासाठी संबंधित प्राध्यापकांना चार मिनिटांचा कालावधी अनिवार्य केला आहे. याअनुषंगाने सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले असून हिवाळी परीक्षांचे मूल्यांकन या नवीन निर्णयानुसार केले जाणार आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा विभागाचा कारभार आॅनलाईन करणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने परीक्षा विभागाने वाटचाल चालविली आहे. मात्र, आॅनलाईन मूल्यांकनाचा दर्जा सुधारावा, यासाठी प्राध्यापकांना मूल्यांकनासाठी आता चार मिनिटे द्यावीच लागतील, त्याशिवाय आॅनलाईन मूल्यांकन प्रक्रिया पुढे सरकणार नाही, याअनुषंगाने सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत.
यापूर्वी आॅनलाईन मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना वेळेचे बंधन नव्हते. त्यामुळे आॅनलाईन मूल्यांकन झपाट्याने होत होते. परंतु मूल्यांकनात गोंधळ, घोळ झाल्याच्या तक्रारी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर प्राध्यापकांना किमान चार मिनिटे पेपर तपासणे कुलगुरूंनी अनिवार्य केले आहे. पेपरचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी संबंधित विषयाच्या प्राध्यापकांवर सोपविली जाते. त्यात घोळ झाल्यास विद्यार्थ्यांचा विद्यापीठ प्रशासनावरच रोष असतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मूल्यांकनादरम्यान प्राध्यापकाचे नाव, मूल्यांकन सुरु आणि पूर्ण झाल्याची वेळ, गुण वन अन्य माहिती विभागप्रमुखांना क्षणात बघता येईल, असा नवा बदल सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आला आहे.
- तर प्राध्यापकांना पेपर रिजेक्टचे अधिकार
आॅनलाईन मूल्यांकन करताना संबंधित प्राध्यापकांना पेपर अस्पष्ट किंवा संशयास्पद दिसून आल्यास त्यांना पेपर रिजेक्ट करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. पेपर रिजेक्ट करुन तो परीक्षा विभागाकडे निर्णयार्थ पाठवू शकतील, अशी माहिती आहे.
‘त्या’ प्राध्यापकांची चौकशी होणार
यापूर्वी आॅनलाईन मूल्यांकनास कमी वेळ देणाºया प्राध्यापकांची चौकशी केली जाणार आहे. त्यानुसार कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी पावले उचलली आहेत. आॅनलाईन परीक्षा, मूल्यांकन व निकालात पारदर्शता, अचुकता आणण्यासाठी योग्य ते निर्णय घेतले जात आहेत.
पेपरचे मूल्यांकन करणारी यंत्रणा ही प्राध्यापक मंडळी आहे. त्यामुळे आॅनलाईन पेपर मूल्यांकनात अचुकता, दर्जा सुधारावा, याकरिता प्राध्यापकांना मूल्यांकनासाठी आता कमीतकमी चार मिनिटे द्यावी लागतील. कुलगुरूंच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
- जयंत वडते
संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.