कोंबून नेताना चार बैलांचा मृत्यू
By Admin | Published: June 16, 2016 12:29 AM2016-06-16T00:29:58+5:302016-06-16T00:29:58+5:30
जनावरांची कत्तलखान्याकडे वाहनात डांबून निर्दयतेने वाहतूक करताना एक ट्रक बेनोडा पोलिसांनी पकडला.
४३ गाई जखमी : बेनोडा पोलिसांची संयुक्त कारवाई
वरूड : जनावरांची कत्तलखान्याकडे वाहनात डांबून निर्दयतेने वाहतूक करताना एक ट्रक बेनोडा पोलिसांनी पकडला. यामध्ये चार बैलाचा गुदमरुन मृत्यू झाला तर ४३ गोवंश जनावरे गंभीरावस्थेत होती. पोलिसांनी यासंदर्भात ट्रक जप्त करुन आरोपींना अटक केली. तालुक्यातून गोवंशाच्या जनावरांची अवैध वाहतूक सुरुच असल्याची खमंग चर्चा परिसरात आहे. ४३ जनावरांची कृष्णगोपाल गोरक्षणमध्ये रवानगी करण्यात आली.
शासनाने गोवंश हत्या बंदी केली असली तरी तालुक्यातून गोवशांची मोठया प्र्रमाणावर तस्करी केल्या जात असल्याची चर्चा सुरु असते. कुणाच्या आशिर्वादाने गोवंशाची तस्करी सुरु आहे, अशी चर्चासुध्दा जनमानसात आहे. काल दुपारी दोन वाजताचे दरम्यान बेनोडा पोलिसांना गोवंशाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी पोलीसासह सापळा रचून ट्रक एम.पी.०९ के.डी. १०८५ मध्ये ताडपत्री झाकून ४७ गोवशांचे जनावरांची वाहतूक करत असताना थांबविला.
यामध्ये तपासणी केली असता चार बैलाचा गुदमरुन मृत्यू झाला होता तर ४३ गोवंश जनावरे गंभीरावस्थेत होती. पोलिसांनी वरुडच्या कृष्णगोपाल गोरक्षण संस्थेमध्ये आणून ४३ जनावरे संगोपनासाठी ठेवली. या प्रकरणात बेनोडा पोलिसांनी ट्रक जप्त करुन आरोपी मो. वसीम खान रा. देवास (म.प्र), अफसर मोहम्मद हनी रा. जून्नारदेव (म.प्र) यांच्या विरुध्द भादंविचे कलम ४२९, (११) प्राणी संरक्षण कायदा, (९) प्राणी संग्रहालय कायद्यांतर्गत कारवाई करुन अटक करण्यात आली. यामुळे मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात गोवंशाची तस्करी होत असल्याची बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.
(तालुका प्रतिनिधी)