नांदगाव तालुक्यात डेंग्यूचे चार रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:09 PM2017-11-23T23:09:00+5:302017-11-23T23:09:10+5:30
ग्रामीण भागात तब्बल तीन दिवसांत चार डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. टिमटाला येथे तीन, तर कोठोडा या गावात एक रुग्ण आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्रामीण भागात तब्बल तीन दिवसांत चार डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. टिमटाला येथे तीन, तर कोठोडा या गावात एक रुग्ण आहेत. सदर चारही रुग्ण हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील असून, राजापेठ येथील एका खासगी डॉक्टरांकडे ते उपचार घेत आहे.
ग्रामीण भागात डेंग्यू या आजाराने डोकेवर काढले असताना, मात्र ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सदर गावात स्वच्छता अभियान राबवून गावातील स्वच्छता त्वरित करावी तसेच गावकºयांना डेंग्यू या आजारासंदर्भात जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे. खासगी पॅथॉलॉजीमध्ये डेंग्यूच्या रुग्णांचे रक्तनमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. पण, जोपर्यंत यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातून डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल येत नाही, तोपर्यंत डेंग्यूचे संशयित रूग्ण मानावे, असे शासकीय आरोग्य यंत्रणेचे म्हणणे असते. त्यामुळे खासगी डॉक्टर रुग्ण पॉझिटिव्ह असल्यानंतरही मान्य करण्यास तयार नसतात. मात्र साथ वाढू नये, सामाजिक जाण व सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून खासगीत ते ‘लोकमत’ला रुग्णांची माहिती देतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सदर रूग्णांचे नमुने घेऊन ते पॉझिटिव्ह आहेत किंवा नाही, यासंदर्भात तपासणी करावी व त्या गावात स्वच्छता अभियान राबवावे अशी मागणी होत आहे.
सदर डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची माहिती खासगी डॉक्टरांनी महानगरपालिकेचा आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला देण्यात आली आहे, हे विशेष!