लोखंडी शिडीला विद्युत तारांचा स्पर्श, शॉक लागून चौघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 02:20 PM2021-12-29T14:20:58+5:302021-12-29T15:01:42+5:30
पी. आर. पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टियुटसमोर बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास लोखंडी शिडीला विद्युत तारांचा स्पर्श(electric shock) होऊन झालेल्या अपघातात चार शिपायांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
अमरावती : लोखंडी शिडीला ११ केव्हीच्या विद्युत तारांचा स्पर्श होऊन झालेल्या अपघातात चौघांचा ऑन द स्पॉट मृत्यू झाला. कठोरा रोडस्थित पी. आर. पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टियुटसमोर बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास ही हृद्यद्रावक घटना घडली. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अक्षय साहेबराव सावरकर (२६, रा. टाकळी जहांगिर), प्रशांत अरूण शेलोरकर (३१, शिराळा), संजय बबनराव दंडवाईक (४५, आदिवासी नगर, अमरावती) व गोकुल शालिकराम वाघ (२९, रा. टाकळी जहांगिर) अशी मृतांची नावे आहेत. चौघेही पी. आर. पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टियुटमध्ये कंत्राटी शिपाई होते, अशी नोंद नांदगाव पेठ पोलिसांनी घेतली आहे.
नांदगाव पेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून चौघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून चौघांनाही मृत घोषित केले.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण, पसरलेलं धूकं आणि काल रात्री बरसलेल्या पावसाने विदर्भाला चांगलेच झोडपून काढले. यात विविध ठिकाणी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. तर, गारपिटीमुळे पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. त्यातच आज पी.आर. पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार शिपायांचा वीज तारांच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.