तोंड झाकून चार जण अन् औषधी विक्रेत्याला लुटले
By प्रदीप भाकरे | Published: July 25, 2023 07:02 PM2023-07-25T19:02:53+5:302023-07-25T19:03:40+5:30
लुटारूंनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळून मोबाइल, रोख, हेडफोन व दुचाकीची चावी असा १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हिसकाविला.
अमरावती : शिराळा गावाजवळ एका औषधी विक्रेत्याला चाकूच्या धाकावर लुटण्यात आले. ही घटना २३ जुलै रोजी रात्री १०:१५ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी वलगाव पोलिसांनी अज्ञात चार लुटारुंविरुद्ध गुन्हा दाखल केला.
चांदूरबाजार येथील रहिवासी मोहम्मद सर्फराज (२५) यांचे माहुली जहागीर येथे मेडिकल स्टोअर आहे. ते दररोज माहुली जहागीरला चांदूरबाजारवरून ये-जा करतात. २३ जुलै रोजी रात्री ते मेडिकल स्टोअर बंद करून दुचाकीने गावी चांदूरबाजारला जात होते. त्यावेळी पाऊस सुरू होता. मार्गात शिराळा गावाजवळ मागून दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी त्यांना अचानक अडविले. चौघेही तोंडाला दुपट्टा बांधून होते.
लुटारूंनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळून मोबाइल, रोख, हेडफोन व दुचाकीची चावी असा १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हिसकाविला. त्यानंतर लुटारूंनी तेथून पळ काढला. सदर घटनेनंतर मोहम्मद सर्फराज यांनी वलगाव ठाणे गाठून तक्रार दाखल केली.