चार पोलिस ठाण्याला मिळाल्या नव्या प्रशासकीय इमारती
By प्रदीप भाकरे | Updated: April 15, 2025 19:03 IST2025-04-15T19:02:59+5:302025-04-15T19:03:35+5:30
पोलिसांसाठी ३८७ निवासस्थाने : १५ चारचाकी वाहनेही

Four police stations get new administrative buildings
प्रदीप भाकरे
अमरावती : पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या सकारात्मक व सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हयातील परतवाडा, खल्लार, खोलापूर व दर्यापूर पोलिस ठाण्याला नव्या कोऱ्या प्रशासकीज इमारती मिळणार आहे. अर्थात ती चारही पोलिस ठाणी नव्या वास्तुत जाणार आहेत. सोबतच, ग्रामीण पोलिस दलासाठी तब्बल ३८७ निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. त्या चार नविन प्रशासकीय इमारती व निवासस्थानाचे लोकार्पण १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंत्रीद्वय अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.
अमरावती ग्रामीण पोलीस आस्थापनेवरील पोलिसांसाठी कोंडेश्वर येथे २०८ निवासस्थान बांधण्यात आले आहेत. सोबतच दर्यापुर येथे ५५ निवासस्थाने, खल्लार येथे १४, खोलापुर येथे २२, बेनोडा येथे २४, वरुड येथे २१, दत्तापुर येथे २५ व तळेगाव पोलिस ठाण्याच्या परिसरात १८ अशी एकिण ३८७ निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. सोबतच जिल्हा नियोजन विकास निधीमधून अमरावती ग्रामीण पोलीस दलास प्राप्त १५ चारचाकी वाहनांचे लोकार्पणदेखील होणार आहे. ३८७ निवासस्थानांच्या बांधकामासाठी एकुण ५० कोटी ६६ लाख ३० हजार १०२ रुपये खर्च करण्यात आला आहे.
शहराला १० वातानुकुलित ट्रॉफिक बुथ
अमरावती शहर पोलीस दलास वाहतूक अंमलदारांसाठी जिल्हा नियोजन विकास निधीमधून १० वातानुकुलित ट्राफिक बुथ मिळाले आहेत. महिला अधिकारी व अंमलदारांना विश्रांतीकरीता विविध सोयीसुविधा युक्त पाच वातानुकुलित महिला विसावा कक्ष व १८ चारचाकी वाहने मिळाली आहेत. त्याचेदेखील बुधवारी लोकार्पण होईल.