‘डेथ ईन कस्टडी’प्रकरणी चार पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:13 AM2021-09-25T04:13:00+5:302021-09-25T04:13:00+5:30

अमरावती : अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या अरूण जवंजाळच्या पोलीस ठाण्यातील आत्महत्येप्रकरणी सीआयडीने वलगाव पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज ...

Four policemen suspended in 'death in custody' case | ‘डेथ ईन कस्टडी’प्रकरणी चार पोलीस निलंबित

‘डेथ ईन कस्टडी’प्रकरणी चार पोलीस निलंबित

Next

अमरावती : अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या अरूण जवंजाळच्या पोलीस ठाण्यातील आत्महत्येप्रकरणी सीआयडीने वलगाव पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. संबंधित अल्पवयीन मुलीसह तिच्या कुटुंबांचे बयाण नोंदविण्यात आले. तर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शुक्रवारी वलगाव पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तत्पूर्वी गुरुवारी घटनेनंतर लगेचच एका महिला पोलीस अंमलदाराला निलंबित करण्यात आले होते. या डेथ इन कस्टडीला त्या चार पोलीस कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक ठपका ठेवण्यात आला आहे.

गुरुवारी दुपारी ३.५५ च्या सुमारास अरुण जवंजाळ (५०, ता. भातकुली) यांनी वलगाव पोलीस ठाण्याच्या आवारातील एका खोलीत पंख्याला शर्टच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना त्यांना ताब्यात घेऊन स्टेशन डायरीनजीकच्या खोलीत बसविण्यात आले. तेथे त्याने आत्मघात केला. त्यामुळे पोलिसांनी लागलीच या घटनेची माहिती सीआयडीला दिली. सीआयडीचे अधीक्षक अमोघ गावकर व उपअधीक्षक दीप्ती ब्राम्हणे यांनी लागलीच मोर्चा सांभाळला. दरम्यान, गुरुवारी रात्री १० च्या सुमारास तिसरे सहदिवाणी न्यायाधीश डी.जे. कळस्कार यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला शासकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला.

दरम्यान, याप्रकरणी ज्या मुलीच्या तक्रारीवरून जवंजाळविरूद्ध दुपारी ४.४४ वाजता बलात्कार व पोक्सो अन्वये गुन्ह्याची नोंद झाली, त्या मुलीसह तिच्या आईचे बयाण सीआयडीकडून नोंदविले गेले. सोबतच जवंजाळ यांना नेमके कुठून ताब्यात घेण्यात आले, ती माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली होती का, याबाबतही ठाणेदारांसह संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले जाणार आहे. जवंजाळने ज्या खोलीत आत्महत्या केली, त्या खोलीत सीसीटीव्ही नाही. मात्र, अगदी शेजारच्या स्टेशन डायरीजवळ कॅमेरा असल्याने जवंजाळ याचे पोलीस ठाण्यात येणे, तेथून दुसऱ्या खोलीत जाणे, हे टिपले गेले असावे, असा सीआयडीचा कयास आहे. ते फुटेज तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे.

////////////

विजयकुमार वाकसेंकडे जबाबदारी

वलगावचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांना तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न केल्यानंतर तेथील पदभार वाहतूक पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्याकडे सोपविण्यात आला. मात्र, प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी असमर्थता दर्शविल्याने वलगावचे ठाणेदारपद तात्पुरते महिला सेलप्रमुख विजयकुमार वाकसे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

Web Title: Four policemen suspended in 'death in custody' case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.