मोर्शी येथे डेंग्यूसदृश आजाराने चार शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:16 AM2021-08-29T04:16:00+5:302021-08-29T04:16:00+5:30
५ते ३० वर्षे वयोगटातील मुलांना ताप येऊन शरीरातील पेशी कमी होत आहे. परिणामी त्यांना शहरातील दवाखान्यात भरती करण्यात येत ...
५ते ३० वर्षे वयोगटातील मुलांना ताप येऊन शरीरातील पेशी कमी होत आहे. परिणामी त्यांना शहरातील दवाखान्यात भरती करण्यात येत आहे. शहरातील अस्वच्छता व डासांचा उद्रेक डेंगू आजाराला कारणीभूत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. ऑगस्ट महिना संपत आला असून, मोर्शी शहरात पाहिजे तसा पाऊस कोसळला नसल्याने उन्हाची दाहकता अजूनही कायम आहे. पावसाच्या या अनियमिततेमुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रशासनाच्यावतीने नाल्यांची साफसफाई व फवारणी केली जात नसून प्रभावी उपाययोजनाअभावी शहरातून सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुंबल्याने डासांचा प्रकोप वाढला आहे. १९ जुलै रोजी मोर्शी येथील रामजीबाबा परिसरातील १४ वर्षीय बालक सर्वेश दिनेश महल्ले याचा, तर ऑगस्ट महिन्यात रुक्मणीनगरातील मयूर शैलेंद्र चौरे या २२ वर्षीय मुलाचा पेठपुरा परिसरातील गौरी प्रवीण मोथरकर (१५) हिचा आणि बेलोना येथील सौरभ दंडाळे (२२) या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना या विषाणूजन्य व संसर्गजन्य रोगाने मोर्शी शहरातील घोरमाडे या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने व इतरही युवकांचा मृत्यू झाल्याने दहशत कायम असतांना आता पुन्हा डेंगूचा आजार आणखी किती बळी घेणार अशी भयावह स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. नगर परिषदेचे उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम व नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या आवारात आंदोलन करून शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे. या गंभीर समस्येकडे मुख्याधिकारी व आरोग्य विभागाने साफसफाई व फवारणीची यंत्रणा युद्धस्तरावर राबविण्यात यावी, अशी मागणी केली होती. आतातरी मोर्शी शहरात दिवसाआड फवारणी करून नाली सफाई ठेवावी, गाजरगवत निर्मूलन मोहीम राबवावी, डासांचा प्रादुर्भाव व डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांची आहे.