राज्यात चार विद्यापीठांना कायमस्वरूपी कुलगुरू नाही; प्रभारी कारभाराने प्रशासन सुस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 02:06 PM2023-02-14T14:06:25+5:302023-02-14T14:30:02+5:30
परीक्षा विभागाच्या कामकाजावर परिणाम
अमरावती : राज्यात मुंबई, पुणे, अमरावती आणि रामटेक येथील विद्यापीठाला कायमस्वरूपी कुलगुरू नसल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. प्रभारी कुलगुरू पूर्णवेळ विद्यापीठाचा कारभार हाताळू शकत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा ढेपाळल्याचे वास्तव आहे. विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरू पदमुक्त झाले की प्र-कुलगुरूही आपोआपच पदमुक्त होतात. त्यामुळे अशावेळी विद्यापीठाचा डोलारा सांभाळणे कठीण होते, हे विशेष.
मुंबई विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे या चार विद्यापीठांमध्ये कायमस्वरूपी कुलगुरू नसल्याने प्रभारी कामकाज सुरू आहे. मुंबई विद्यापीठाचा प्रभार कोल्हापूर येथील कुलगुरूंकडे आहे. अमरावती विद्यापीठाचा प्रभार औरंगाबाद तर पुणे विद्यापीठाचा प्रभार लोणेरे येथील कुलगुरूंकडे आणि रामटेक विद्यापीठाचा कारभार तेथील प्र-कुलगुरूंकडे सोपविण्यात आला आहे. शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविणाऱ्या विद्यापीठांमध्ये कुलगुरूपदाचा कारभार प्रभारींवर चालत असेल तर अन्य यंत्रणांवर वचक राहत नाही. प्रभारी कुलगुरूंना दोन विद्यापीठांचा कारभार हाताळताना त्यांचीसुद्धा दमछाक होते. हल्ली परीक्षांचा कालावधी असल्यामुळे प्रभारी कुलगुरूंमुळे नियोजनात उणिवा जाणवत असल्याचे चित्र आहे.
नवे राज्यपाल मिळाले, कुलगुरूंची प्रतीक्षा
राज्यात नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबई, पुणे, अमरावती आणि रामटेक येथील चार विद्यापीठांना नव्या कुलगुरूंची प्रतीक्षा आहे, असे दिसून येते. राज्यपाल बैस यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर चार विद्यापीठांमध्ये रिक्त कुलगुरू पदाची भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणीदेखील पुढे येत आहे.