मजुरांना घेऊन जाणारी चारचाकी उलटली; अपघातात एक ठार, आठ गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 11:50 AM2022-07-27T11:50:58+5:302022-07-27T14:28:35+5:30
चिखलदरा तालुक्यात चार चाकी टेब्रुसोंडा नजीक आश्रमशाळेच्या वळणावर आज सकाळी चारचाकी वाहन उलटून अपघात झाला.
अमरावती : मेळघाटबाहेर शेतातील निंदणाच्या कामासाठी नेणाऱ्या मजुरांचे भरधाव चारचाकी वाहन बुधवारी सकाळी टेंब्रुसोंडा गावानजीक उंच टेकडीच्या मार्गावरून कपारीत उलटले. रस्त्याच्या सुरक्षा भिंतीवरून कलंडलेले हे वाहन एका ठिकाणी अडकले. तथापि, या अपघातात एक मजूर जागीच ठार झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास हा अपघात घडला.
गंभीर जखमींवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुरेश जामुनकर (३५, रा. आढाव, ह.मु. कुलंगणा) असे मृताचे नाव आहे. अंजू संजू कासदेकर (२३), पद्मा किसन बेलसरे (२१), शीला राजेश गावडे (२५), बेबी अरुण कासदेकर (१४), लक्ष्मी कासदेकर (३४), संजय बेलसरे (१६), कालू गंगाराम कासदेकर (१८) बाबुराव बेलसरे (३२), शोभा जावरकर (४०), ललिता कासदेकर (१६), सुकलाल बेलसरे (३३), आनंद कासदेकर (१७, सर्व रा. कुलंगणा व वस्तापूर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मेळघाटातील आदिवासी मजूर शहरी भागात शेतीच्या विविध कामासाठी जातात. त्यानुसार बुधवारी तालुक्यातील टेंब्रुसोंडा परिसरात असलेल्या कुलंगणा व वस्तापूर गावातील मजूर या खासगी चारचाकी वाहनाने निघाले होते. चालकाने भरधाव वाहन चालविल्याने हा अपघात घडला. जखमींवर स्थानीय टेब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. प्रत्यक्षात या वाहनात ३० पेक्षा अधिक आदिवासी असल्याची परिसरात चर्चा आहे. चिखलदरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.