मेळघाटात चार वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:05 PM2018-08-26T23:05:56+5:302018-08-26T23:07:13+5:30
मेळघाटात चार वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. हर्षल दयाराम बेलसरे (वय ४ वर्ष रा.गौलखेडाबाजार) असे मृताचे नाव आहे. तो पंधरा दिवसांपासून आजारी असताना त्याच्यावर वैद्यकीय उपचार न करता त्याला भुमकाजवळ नेण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुरणी (अमरावती ) : मेळघाटात चार वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. हर्षल दयाराम बेलसरे (वय ४ वर्ष रा.गौलखेडाबाजार) असे मृताचे नाव आहे. तो पंधरा दिवसांपासून आजारी असताना त्याच्यावर वैद्यकीय उपचार न करता त्याला भुमकाजवळ नेण्यात आले होते.
हर्षलच्या अंगावर एक फोड आला होता, मात्र, कुटुंबियांनी त्याला डॉक्टरांकडे न नेता घरीच मंत्रोपचार व गावठी औषधोपचार केला. शुक्रवारी रात्री हर्षलचा मृत्यू झाल्यानंतर गावात चर्चेला उधाण आले. या घटनेवरून मेळघाटातील आदिवासी आजही अंधश्रध्देला खतपाणी घालत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मंत्रोपचार करणाऱ्या ‘भगत भुमका’वर कठोर कारवाई करावी, असा सूर मेळघाटात उमटू लागला आहे. जनजागृतीचा अभाव, तालुका व जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणेकडून योग्य तो प्रतिसाद न मिळणे, आरोग्य विभागाचे कर्मचारी व भरारी पथकांचे मुख्यालयी न राहणे हे सुध्दा यामागील कारणे असण्याची शक्यता आहे. अनेकदा आरोग्य कर्मचारी रुग्णांना उपजिल्हा किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जातात. मात्र, रुग्णांची मानसिकता पाहता, ते उपचार घेण्याची तयारी दाखवित नाही. याशिवाय त्यांना त्रास होत असल्याचीही ओरड होते. त्यामुळे मेळघाटात अंधश्रध्दा वाढण्यास मदत मिळत असल्याचे दिसून येत आहे.
आजारी बालकाच्या घरी उपचारासाठी गेलो असता संबंधित पालकांनी उपचार करवून घेण्यासाठी नकार दिला. आम्हाला घरात सुध्दा येऊ दिले नाही. परिणामी प्रकृती गंभीर झाली आणि तो दगावला.
- सचिन राठोड,
वैद्यकीय अधिकारी, गौलखेडाबाजार आरोग्य केंद्र.
मेळघाटातील आदिवासीचा अशाप्रकारे मृत्यू होण्याची बाब आम्ही खपवून घेणार नाही. आरोग्य विभागाने उचित मार्गदर्शन केले असते, तर त्या बालकाचा जीव वाचवला जाऊ शकला असता.
- मंगलसिंग धुर्वे,
शिवसेना तालुकाप्रमुख, चिखलदरा.