विदर्भातील 'सुलतान'ची मुंबईला होणार रवानगी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 08:49 PM2019-12-23T20:49:32+5:302019-12-23T20:57:25+5:30

बोरीवलीतील सर्वात वयोवृद्ध वाघीण म्हणून या बसंतीकडे बघितले जाते.

Four-year-old sultan tiger from Vidarbha will leave for Mumbai! | विदर्भातील 'सुलतान'ची मुंबईला होणार रवानगी!

विदर्भातील 'सुलतान'ची मुंबईला होणार रवानगी!

googlenewsNext

- अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : गोरेवाड्यात दीड-दोन वर्षांपासून मुक्कामाला असलेल्या चार वर्षीय ‘सुलतान’ नामक सी-वन वाघाची मुंबई स्थित बोरीवली नॅशनल पार्कला रवानगी होत आहे. त्याच्यावर तेथील तीन वाघिणींकरवी व्याघ्र प्रजननाची जबाबदारी सोपविली जाणार आहे.
बोरिवली नॅशनल पार्कमध्ये आठ ते दहा वर्षे वयोगटातील लक्ष्मी, बिजली आणि मस्तानी या तीन वाघिणी आहेत. सोबतीला लक्ष्मीचा आठ वर्षीय भाऊ ‘आनंद’ वाघ आहे. या सर्वांसोबत १८ वर्षांची बसंती नामक वाघीण आहे. ही बसंती कर्नाटकमधून बोरीवलीत आली आहे.

बोरीवलीतील सर्वात वयोवृद्ध वाघीण म्हणून या बसंतीकडे बघितले जाते. दरम्यान, लक्ष्मी, बिजली व मस्तानीचे आजपर्यंत प्रजनन झालेले नाही. या तिघींपासूनही बोरीवलीत शावक (पिले) जन्माला यावीत, याकरिता एक वर्षापासून बोरीवलीतील वन्यजीव प्रशासन प्रजननक्षम वाघाच्या शोधात होते. यात त्यांना गोरेवाड्यात मुक्कामाला असलेल्या ब्रम्हपुरी-ताडोबा परिसरातील उपद्रवी चार वर्षीय सुलतानची माहिती मिळाली.

अखेर आवश्यक त्या सर्व प्रक्रिया आणि परवानगी मिळवित सुलतानचा हक्क त्यांनी मिळविला. या सुलतानला बोरीवलीला नेण्याकरिता पशुवैद्यकीय अधिकारी शैलेश पेठे, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांच्यासह वैभव पाटील, संदीप गायकवाड, राजेंद्र भुईर, नंदू पवार, भागडे यांचा समावेश असलेले वन्यजीव पथक २२ डिसेंबरला बोरिवलीवरून निघाले. ते २४ डिसेंबरला सुलतानला ताब्यात घेतील.

वैद्यकीय चाचणीनंतर ‘सुलतान’ अद्ययावत अशा राज्यातील एकमेव रुग्णवाहिकेतून नऊशे किलोमीटरचा प्रवास करीत बोरीवलीत दाखल होणार आहे. या रुग्णवाहिकेत एक हायड्रॉलिक पिंजरा आहे. औषधांचा साठा आहे. डॉक्टर आहेत. छोटेखानी आॅपरेशन थिएटर आहे. रुग्णवाहिकेवर सायरनसह अद्ययावत विद्युत व्यवस्था आणि ध्वनिक्षेपक आहे. प्रवासादरम्यान दर दोन तासांनी सुलतानची काळजी घेतली जाणार आहे. त्याला आवश्यक त्या ठिकाणी गरजेनुसार खाद्य म्हणून बकºयाचे ताजे मटण दिले जाणार आहे. प्रवासात आरोग्यासह सर्व काळजी घेणार आहेत. 

एकमेव रुग्णवाहिका 
सुलतानला घेण्याकरिता आलेली  रुग्णवाहिका अत्यंत अद्ययावत आहे. या रुग्णवाहिकेतील डॉ. शैलेश पेठे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन शेकडो वन्यजीवांचे प्राण वाचविले आहेत. साठहून अधिक बिबट्यांचे प्राण वाचविले. या रुग्णवाहिकेचा अभ्यास करण्याकरिता बारा राज्यांतील वन्यजीव पथक बोरिवलीत येऊन गेले आहेत.

Web Title: Four-year-old sultan tiger from Vidarbha will leave for Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.