स्वित्झर्लंडमध्ये चार संशोधक युवतींनी फडकवला तिरंगा, दोघी अमरावतीच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 10:55 AM2022-01-03T10:55:06+5:302022-01-03T14:00:17+5:30
‘जिनिव्हा चॅलेंज’ या जागतिक, सामाजिक आव्हान परिषदेमध्ये भारताच्या चार संशोधक युवतींनी जागतिक क्रमवारीत द्वितीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे या चौघींपैकी दोघी अमरावतीच्या आहेत.
अमरावती : स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा स्थित ‘ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट’मध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘जिनिव्हा चॅलेंज’ या जागतिक, सामाजिक आव्हान परिषदेमध्ये भारताच्या चार संशोधक युवतींनी जागतिक क्रमवारीत द्वितीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे या चौघींपैकी दोघी अमरावतीच्या आहेत. ही परिषद स्विस राजदूत जेनो स्टेहेलीन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
‘सामाजिक समावेशन आणि समाजात उद्भवणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्या’ यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर विकास समस्यांवर सैद्धांतिक आणि व्यावहारिक निराकरणासाठी सखोल संशोधन करणाऱ्या विद्वान पदव्युत्तर नवसंशोधकांसाठी ‘जिनिव्हा चॅलेंज’ हा जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संशोधन मंच आहे. ‘भारतीय सार्वजनिक आरोग्य आणि धोरण’ या विषयावर मीनल मदनकर, डॉ. पूजा सावळे, डॉ. अनुकृती छाबरा आणि डॉ. हर्षल शिरोडकर या चार भारतीय संशोधक युवतींच्या संघाने प्रकल्प सादर केले.
आशिया खंडातून झाली निवड
जिनेव्हा चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातून एकूण ३६६ संघांची नोंदणी करण्यात आली. जगभरातून एकूण ५५८ आरोग्य विद्वानांनी १४५ प्रकल्प सादर केले. त्यापैकी शैक्षणिक सुकाणू समितीने १६ उपांत्य फेरीतील संघ निवडले. त्यामधून भारतीय संशोधक संघाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, आशिया खंडातून एकमेव भारताचे हे चार प्रतिनिधी परिषदेला आमंत्रित होते.
अरण्य फाउंडेशनच्या संस्थापक
मीनल मदनकर आणि डॉ. पूजा सावळे या अमरावती स्थित अरण्य फाउंडेशनच्या संस्थापक कार्यकारी सदस्य आहेत. ही सामाजिक संस्था देशातील १७ आणि विदेशतील ६ अशा एकूण २३ शीर्ष विद्यापीठातील १६० हून अधिक संशोधक आणि प्राध्यापकांनी बनवलेली सेवाभावी संस्था असून संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास उद्दिष्टे या विषयांतर्गत भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागातील समकालीन सामाजिक समस्यांवर संशोधन करते.