पीएसआयची चौथ्यांदा बदली
By admin | Published: June 12, 2017 12:21 AM2017-06-12T00:21:18+5:302017-06-12T00:21:18+5:30
शहर कोतवालीतील पोलीस उपनिरीक्षक आर.एस. लेवटकर यांची नुकतीच भातकुली ठाण्यात बदली करण्यात आली.
वरिष्ठांकडे दाद : भंडारी प्रकरणाचा तपास काढला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहर कोतवालीतील पोलीस उपनिरीक्षक आर.एस. लेवटकर यांची नुकतीच भातकुली ठाण्यात बदली करण्यात आली. गेल्या दहा महिन्यांत झालेली त्यांची ही चौथी बदली आहे. नवीनचंद्र भंडारीच्या महापालिकेतील बनवेगिरी प्रकरणाचा तपासही त्यांच्याकडून काढण्यात आला. आपल्या या बदलीसत्रामागे पाणी मुरत असल्याची शंका लेवटकर यांनी उपस्थित केली आहे.
लेवटकर यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर दाद मागणार आहेत. मॅटसह मुख्यमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकापर्यंत तक्रार करून पोलीस विभागातील अशा घडामोडींची चौकशी करण्याची मागणी ते करणार आहेत. लेवटकर यांची प्रथम वलगाव पोलीस ठाण्यात पदोन्नतीने बदली करण्यात आली. तेथून त्यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली. तेथून त्यांना कोतवाली ठाण्यात पाठविण्यात आले व आता तर कोतवालीतून थेट भातकुली पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. लेवटकर यांच्याकडे महापालिकेतील भंडारी यांच्या बनवेगिरीच्या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यांच्या तपासकार्यामुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने लेवटकर यांच्या हातातील तपासकार्य काढून टाकण्यात आल्यामुळे आता हे प्रकरण थंडबस्त्यात पडून आहे. आपल्या बदलीमागे राजकारण असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. कोतवालीतून बदली होण्यापूर्वी लेवटकर यांना प्रशिक्षणासाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. दरम्यान ही बदली झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बदली अधिनियम २००५ नुसार तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बदली करण्यात येते. तथापि तीन वर्षांचा नियम डावलून आपली वर्षभरात चौथ्यांदा बदली का करण्यात आली, असा प्रश्न लेवटकर यांना पडला आहे.
गुन्हे शाखेत फेरबदलाचा गुंता कायम
गुन्हे शाखेतून बदली झालेले काही पोलीस अधिकारी व कर्मचारी पुन्हा पूर्व पदावर आले आहेत. या फेरबदलाविषयी पोलीस वर्तुळात घमासान चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे अन्य ठाण्यांतील काही पोलीस बदल्यासंदर्भात नाराजी व्यक्त करीत आहे.