देशात चौथी व्याघ्र प्रगणना २० जानेवारीपासून, जंगलाबाहेरसुद्धा मोजणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 05:59 PM2018-01-15T17:59:37+5:302018-01-15T18:00:05+5:30
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण देहरादूनच्या निर्देशानुसार देशभरातील जंगलांमध्ये ट्रॉन्झॅक्ट लाईन टाकून वाघ व अन्य वन्यप्राण्यांची प्रगणना होणार आहे. ही प्रगणना २० जानेवारीपासून सुरू होऊन साधारणत: आठवडाभर चालणार आहे.
- गणेश वासनिक
अमरावती - राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण देहरादूनच्या निर्देशानुसार देशभरातील जंगलांमध्ये ट्रॉन्झॅक्ट लाईन टाकून वाघ व अन्य वन्यप्राण्यांची प्रगणना होणार आहे. ही प्रगणना २० जानेवारीपासून सुरू होऊन साधारणत: आठवडाभर चालणार आहे.
देशात लोकसंख्या मोजण्यासाठी जनगणना केली जाते. त्याच पद्धतीप्रमाणे आणि त्यात जंगलाचे नियम लावून सन २०१३ नंतर देशात चौथी वाघ व अन्य प्राणीगणना २० ते २७ जानेवारीपर्यंत एकाच टप्प्यात होईल. या वन्यजीव प्रगणेत मोबाईल अॅपच्या माध्यमातून डेटा संकलन आणि त्यांची नोंद डिजिटाईज करण्यात येईल. या प्राणी प्रगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे देशभरातील ४२ व्याघ्र प्रकल्प याशिवाय प्रादेशिक वनविभाग, वनविकास मंडळांच्या जंगलातसुद्धा प्राणी प्रगणना होणार आहे. मात्र, वाघांच्या पायाचे ठसे घेण्यासाठी यापूर्वी पीआयपी ही पद्धत वापरली जात होती. ती आता असणार नाही. यामध्ये राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या निर्देशानुसार व त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे ही प्रगणना होत आहे. आॅनलाईन डेटा भरल्यानंतर प्रगणनेचे संकलन करून त्या-त्या राज्यांचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) ही माहिती देहरादून संस्थेला पाठवतील. त्यानंतर देशभरातील वन्यजीवांचा आकडेवारी समोर येईल. परंतु, याकरिता मे पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ट्रॉन्झॅक्ट लाईन व प्रगणनेचे प्रशिक्षण
देशभरात होणा-या प्राणी प्रगणनेत अचूक माहिती मिळण्यासाठी देशभरातील वनाधिकाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. क्षेत्रीय वनाधिका-यांना प्रत्येक बीटमध्ये २ कि.मी. अंतराची सरळ ट्रॉन्झॅक्ट लाईन टाकून त्यावर ४०० मीटर अंतरावर १ ते १५ मीटरची व्यासाचे गोल डब्बे टाकून त्यामध्ये वनस्पती, गवत, झुडपे, वन्यजीवांच्या पाऊलखुणा, विष्ठा, मुत्र आदींचा अभ्यास करावा लागणार आहे. यासाठी जीपीएस एम. स्ट्राप्स ही प्रणाली उपयोगात आणली जात आहे.
जंगलाबाहेर वन्यजीवांचा शोध
देशभरात एकाच वेळी होणा-या चौथ्या वन्यजीव प्रगणनेत जंगलासोबतच ज्या ठिकाणी जंगल नाही. मात्र, वन्यजीवांचे अस्तित्व आहे; अशा ठिकाणी शेती क्षेत्रातसुद्धा ही प्रगणना होईल. त्यामुळे या वन्यजीव गणनेला फार महत्त्व असणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने प्रगणना करण्याच्या कामाची युद्धपातळीवर तयारी सुरू झालेली असून वनांवर आलेला भार, नष्ट प्रजाती यांचे विश्लेषण या माध्यमातून होणार आहे.