भिसीत फसवणूक; महिला संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 01:30 AM2018-06-15T01:30:52+5:302018-06-15T01:30:52+5:30
भिसी योजनेतून फसवणूक झालेल्या महिला गुरुवारी पत्रपरिषद घेणाऱ्या छाया आहुजाला मारहाण करण्यासाठी पोहोचल्या होत्या. भिसी चालविणाऱ्या छाया आहुजा पत्रपरिषदेतून बाहेर येताच महिलांनी नारेबाजी करीत गोंधळ घातल्याने खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भिसी योजनेतून फसवणूक झालेल्या महिला गुरुवारी पत्रपरिषद घेणाऱ्या छाया आहुजाला मारहाण करण्यासाठी पोहोचल्या होत्या. भिसी चालविणाऱ्या छाया आहुजा पत्रपरिषदेतून बाहेर येताच महिलांनी नारेबाजी करीत गोंधळ घातल्याने खळबळ उडाली. राजापेठ ठाण्यालगत असलेल्या पत्रकार भवनासमोर हा प्रकार घडला.
रामपुरी कॅम्प परिसरातील रहिवासी छाया आहुजा यांनी भिसीच्या माध्यमातून महिलांकडून लाखो रुपये घेतले. मात्र, ते पैसे परत न दिल्याने महिलांनी गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून छाया आहुजा यांना अटक केली. त्यानंतर त्या जामिनावर बाहेर आल्या. मात्र, भिसीचे पैसे न मिळाल्याने शेकडो महिला छाया आहुजा यांच्या घरासमोरच उपोषणाला बसल्या होत्या.
छाया आहुजा यांनी आपली बाजू मांडण्यासाठी राजापेठस्थित पत्रकार भवनात गुरुवारी पत्रपरिषद बोलावली. यादरम्यान फसवणूक झालेल्या महिलांनी पत्रकार भवनात धडक देऊन छाया आहुजावर रोष व्यक्त केला. काही पत्रकारांनी त्या महिलांना बाहेर थांबण्यास सांगितले. पत्रकार परिषदेनंतर महिलांनी बाहेरील आवारात नारेबारी करीत छाया आहुजांविरोधात रोष व्यक्त केला. यावेळी राजापेठ पोलिसांना पाचारण करावे लागले. छाया आहुजा बाहेर आल्यावर त्यांना चोप देण्याचा बेत महिलांनी आखला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने तो हाणून पाडला.