एफसीआयची बनावट आॅर्डर देऊन फसवणूक
By admin | Published: June 11, 2017 12:03 AM2017-06-11T00:03:30+5:302017-06-11T00:03:30+5:30
फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडियात नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवून बनावट आॅर्डर दिली आणि ११ लाखांनी युवकाची फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी परिगणित कॉलनीत उघडकीस आली.
नोकरीचे आमीष : ११ लाखांनी गंडविले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडियात नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवून बनावट आॅर्डर दिली आणि ११ लाखांनी युवकाची फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी परिगणित कॉलनीत उघडकीस आली. या प्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी मंगेश वानखडे (रा.परिगणित कॉलनी) व आशिष जाधव (रा.बुलडाणा) यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
आदर्श नेहरू नगरातील रहिवासी गणेश किसन बैलमारे यांच्या मुलाने कला शाखेत शिक्षण घेतल्यानंतर तो नोकरीच्या शोधात होता. दरम्यान गणेश बैलमारे यांचा मोठा मुलगा व आरोपी मंगेश वानखडे यांची मार्केटिंग व्यवसायातून ओळख झाली. त्यावेळी मोठ्या मुलाने लहान भावासाठी नोकरी पाहण्याविषयी मंगेश वानखडेला सुचविले. त्यामुळे मंगेश वानखडेने गणेश बैलमारे व त्यांच्या मुलाला कार्यालयात बोलावले आणि फूड कार्पोरेशन इंडियात नोकरीची संधी असल्याचे सांगितले. माझ्या परिचयातून तुमच्या मुलाला नोकरी लावून देतो, यासाठी ११ लाख रुपये द्यावे लागतील, असे वानखडेने बैलमारेना सांगितले.
तक्रार दाखल
अमरावती : नोकरीसाठी बैलमारे यांनी मंगेशला ३ लाख देत आॅर्डरनंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले. यानंतर बैलमारे यांनी अविनाश जाधवांच्या बँक खात्यात दोन लाखांची रक्कम जमा केली. आरोपींनी बैलमारे यांच्या नावाने एफसीआयची मुद्रा असलेल्या नियुक्तीपत्राची झेरॉक्स बैलमारेंना दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तक्रार नोंदविण्यात आली.