धामणगाव बाजार समितीत अडत्यांची फसवणूक, व्यापाऱ्याविरूध्द गुन्हा
By प्रदीप भाकरे | Published: May 28, 2024 05:23 PM2024-05-28T17:23:04+5:302024-05-28T17:25:22+5:30
विक्री केलेल्या धान्याचा मोबदला देण्यास नकार.
प्रदीप भाकरे, अमरावती : धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीत एका ६४ वर्षीय व्यापाऱ्याने तेथीलच १६ अडत्यांचे पैसे बुडविल्याची तक्रार करण्यात आली आहे. १२ सप्टेंबर २०२३ ते २८ जानेवारी २०२ध दरम्यान ती फसवणुकीची मालिका चालल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी, अडत व्यापारी पवन लाहोटी (४४, आदर्श कॉलेजसमोर, धामणगाव रेल्वे) यांच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी २७ मे रोजी रात्री ११.४४ च्या सुमारास आरोपी चंद्रशेखर मदनलाल पसारी (६४, रा. धामणगाव रेल्वे) याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सध्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
पवन लाहोटी हे धामणगाव रेल्वे कृषि उत्पन्न बाजार समिती येथे अडत व्यापारी म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत इतरही बरेच लोक अडत व्यापारी म्हणून काम करतात. लाहोटी व अन्य अडत्यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये धान्याचा लिलाव घेतला. लिलाव केलेल्या धान्याचे पैसे देखील अडत व्यापाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिले. तर, दुसरीकडे विक्री केलेल्या धान्याचा मोबदला १५ ते २० दिवसांनी देतो, अशी बतावणी आरोपी चंद्रशेखर पसारी याने अडत व्यापाऱ्यांना केली. त्यांनी देखील विश्वास व नेहमीचा व्यवहार असल्याने तितके दिवस प्रतीक्षा केली. मात्र, काही महिने उलटून गेल्यानंतरही रक्कम न मिळाल्याने पवन लाहोटी व अन्य १५ अडत व्यापारी पसारींकडे गेले. तेव्हा त्याने आम्हाला पैसे देत नाही, अशी धमकी दिल्याचे लाहोटी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
व्यापारी म्हणून त्याच्यावर असलेल्या विश्वासाचा त्याने गैरफायदा घेतल्याचे देखील लाहोटी यांनी म्हटले आहे. अनेकदा रकमेची मागणी करूनही ती न मिळाल्याने अखेर २७ मे रोजी अडत व्यापाऱ्यांनी दत्तापूर पोलीस ठाणे गाठले.