विदेशी नोटांच्या नावे गंडविले; बॅगमध्ये निघाले रद्दी पेपर!
By प्रदीप भाकरे | Published: July 29, 2024 05:24 PM2024-07-29T17:24:41+5:302024-07-29T17:28:54+5:30
दर्यापूर शहरातील घटना : कोलकत्याच्या तीन भामट्यांविरूध्द गुन्हा
अमरावती : विदेशी नोटा देण्याच्या नावावर एका व्यावसायिकाला बॅगमध्ये चक्क रद्दी पेपर देऊन ५० हजार रुपयांनी गंडविण्यात आले. ही घटना २८ जुलै रोजी दर्यापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यावसायिकाच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शिवकुमार (४०), राकेश (३५) व ५५ वर्षीय महिला (सर्व रा. कोलकता, पश्चिम बंगाल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
एफआयआरनुसार, दर्यापुरातील पंजाबराव कॉलनी येथील रहिवासी उमेश सुरेश गावंडे (३८) यांचे तेथेच सेतू व मिनी बँक ऑनलाइन सेंटर आहे. उमेश गावंडे हे रविवारी सेंटरवर असताना शिवकुमार नामक तरूण हा त्यांच्याकडे गेला. माझ्याकडे विदेशी नोटा आहेत, त्या भारतीय चलनात बदलून देता का, अशी विचारणा त्याने उमेश यांच्याकडे केली. उमेश यांनी त्याला होकार दिला. त्यानंतर शिवकुमार याचे साथीदार राकेश व एक महिला हे दोघे उमेश यांना भेटले. विदेशी नोटा देण्यासाठी त्यांनी उमेश यांच्याकडून ५० हजार रुपये रोख दिले. त्याचवेळी त्या दोघांनी उमेश यांना एक कॉलेज बॅग दिली. त्या बॅगमध्ये विदेशी चलनाच्या नोटा असल्याचे सांगून ते दोघे तेथून निघून गेले.
बॅग पाहताच झाली फसवणुकीची जाणिव
आरोपी काही अंतरावर गेल्यानंतर उमेश गावंडे यांनी बॅग उघडून पाहिली. त्यात विदेशी नोटांऐवजी रद्दी पेपर असल्याचे त्यांना दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी दर्यापूर ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.